क्रूजवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेली मूनमून धमेचा munmun dhamecha हिला जामीन मिळाला असला तरी जामीनदार नसल्याने तिची सुटका लांबली आहे. या प्रकरणात आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंड या तिघांना अटक करण्यात आली होती. तिघांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.
तब्बल २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला होता. या तिघांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्यांना लगेच सोडले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, आर्यन खान वगळता अन्य दोघांची सुटका लांबली आहे. त्यामुळे मुनमुन धमेचाचे वकील मुंबई उच्च न्यायालयात धावाधाव करत असून तिची सुटका नियमांच्या कचाट्यात अडकली आहे.
आर्यन खानसोबतच मुंबई उच्च न्यायालयाने मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना देखील जामीन मंजूर केला. आर्यन खानसाठीची कोर्ट ऑर्डर आणि ऑपरेटिव्ह पार्ट सुटकेसाठी तुरुंगात पोहोचला. मात्र, मुनमुन धमेचाची ही कागदपत्रे पोहोचली नव्हती.
एक लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यन खानची जामिनावर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. आर्यन खानसाठी जुही चावला जामीनदार आहे. असा जामीनदार शोधण्यात मुनमुन धमेचाला अडचण येत आहे. मुनमून तात्पुरत्या रोख रकमेच्या जामिनावर सोडावे, अशी विनंती तिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली आहे. ती मध्य प्रदेशची रहिवासी असल्यामुळे तिला जामीन राहणारी व्यक्ती शोधण्यात अडचणी येत असल्याचे बार अँड बेंचकडून सांगण्यात आले.
मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. 'एनसीबी'ने ३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता तिला अटक केली होती. मुनमुन ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील. तिचे वडील उद्योजक होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.मुनमुन धामेचा हिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तिचा भाऊ प्रिंस धमेचा हा दिल्लीत वास्तव्याला आहे. मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. कारण मागील काही वर्ष ती आपल्या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे.
हेही वाचलं का?