पाचोरा तालुक्यातील सावखेड बु गावात आज (दि ३०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पत्नीचा गळा आवळून खून करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु येथे राहणारे सतीश धनसिंग परदेशी (वय ३८), गायत्री सतीश परदेशी (वय ३२), ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह राहत हाेते. शुक्रवारी पहाटे सतीशने झोपेत असलेल्या पत्नी गायत्रीचा गळा आवळून खून केला. यानंतर घराबाहेर येवून आरडाओरड करून तो पळत सुटला. त्याच्या ओरडण्याचा आवाजाने शेजारी राहणारा त्याचा भाऊ संदीप जागा झाला. त्याच्या पाठीमागे जाऊन इतक्या रात्री कुठे जात आहेस. असा आरडाओरडा का करीत आहेस? असे त्याने सतीशला विचारले. तू मला अडवू नको, मी माझ्या पत्नीचा गळा आवळून खून केला असल्याचे त्याने संदीपला सांगितले.
संदीपने घरी येऊन पाहिले असता सतीश याची पत्नी गायत्री मृत अवस्थेत दिसली. मुले झोपलेली हाेती. संजय सोनवणे हे सकाळी ९ वाजता स्वतःच्या शेतात जात असताना सतीशने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनास्थळी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक फौजदार विजय माळी, हवालदार दिपकसिंग पाटील, संदीप राजपूत, वाहनचालक दीपक अहिरे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
सतीश परदेशी त्यांचे वडील धनसिंग चिंधा परदेशी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज ( दि ३०) त्यांच्या अस्थी नाशिकला नेण्यात येणार होत्या. यापूर्वी मुलगा सतीश याने केलेल्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.