‘सनातन’वर वादग्रस्‍त विधान का केले? उदयनिधि म्‍हणाले, ‘मोदी अँड कंपनीचे…’

तामिळनाडूचे मंत्री उद्‍यनिधी स्‍टॅलिन. ( संग्रहित छायाचित्र )
तामिळनाडूचे मंत्री उद्‍यनिधी स्‍टॅलिन. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सनातन धर्मावर वादग्रस्‍त विधान करुन चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी आलेले तामिळनाडूचे मंत्री उद्‍यनिधी स्‍टॅलिन यांनी आज (दि.७) खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका करत आपल्‍या विधानाचा विपर्यास केल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी न्‍यायालयीन लढाईचाही निर्धार केला आहे.दरम्‍यान,सनातन धर्माचा अवमान करणार्‍यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिले होते. आता उदयनिधी यांनी खुलासा करता पंतप्रधान मोदींना लक्ष्‍य केल्‍याने या प्रकरणी पुन्‍हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपची सर्व आश्‍वासने ठरली पोकळ

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी सनातन धर्मावर टीका केली होती. यावर खुलासा करताना उद्‍यनिधी म्‍हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूर हिंसाचारप्रश्‍नाला समोरे जाण्‍याच्‍या भीतीने जगभर दौरे करत आहेत. मागील ९ वर्षांपासून भाजपने दिलेली सर्व आश्‍वासने पोकळ ठरली आहेत. सध्या संपूर्ण देश भाजप सरकारविरोधात एकवटला आहे. तुम्‍ही आमच्‍या कल्याणासाठी काय केले?, असा सवाल जनता भाजपला करत आहे."

मोदी अँड कंपनीचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातन धर्मावर बोललो

मोदी अँड कंपनीचे लक्ष विचलित करण्यासाठी 'सनातन धर्मावर बोलण्‍याच्‍या युक्त्या वापरत आहे, असा खुलासा करत भाजप नेत्यांनी माझे 'टीएनपीडब्‍ल्‍यूएए' परिषदेतील भाषणाला 'नरसंहार भडकावणारे' असे संबोधले. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री 'फेक न्यूज'च्या आधारे माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत हे धक्‍कादायक आहे, असेही उदयनिधी म्‍हणाले.

माझ्‍याविरोधात खोट्या अफवा पसरवल्‍या

सत्ता इतर कोणत्या मार्गाने वाचवता येईल हे त्यांना माहीत नाही. त्‍यामुळे माझ्या विरोधात खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा करत माझ्‍यावर निराधार आरोप करणार्‍यांवरही फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. सर्वांना माहित आहे की आम्ही कोणत्याही धर्माचे शत्रू नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

… तर त्‍या धर्माला विरोध करणारा मी पहिला व्‍यक्‍ती असेन

कोणताही धर्म जर लोकांना समतेकडे घेऊन जात असेल आणि बंधुत्वाची शिकवण देत असेल तर मी सुद्धा अध्यात्मवादी आहे. कोणत्याही धर्माने जातींच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली, त्यांना अस्पृश्यता आणि गुलामगिरी शिकवली, तर त्या धर्माला विरोध करणारा मी पहिला व्यक्ती असेन. जे धर्म सर्व लोकांना समतेची वागणूक देताना त्या सर्व धर्मांचा द्रमुक आदर करतो, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

सीमेवर उभे राहून पांढरा झेंडा फडकवतात…

मोदी अँड कंपनी संसदीय निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी केवळ अपशब्दांवर अवलंबून आहेत. मला त्यांच्याबद्दल फक्त वाईट वाटू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांमध्‍ये काहीच केलेले नाही. कधी ते नोटाबंदी करतात तर कधी झोपडपट्टी लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते रातोरात भिंत बांधतात. इतकेच नाही तर संसदेची नवी इमारत बांधतात आणि तेथे सेंगोल (राजदंड) ठेवतात. तर सीमेवर उभे राहून पांढरा झेंडा फडकवतात, अशी बोचरी टीकाही उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news