Sanatan controversy: सनातनवरील टीकेला जशास तसे उत्तर द्या- पंतप्रधानांचा आदेश; ‘इंडिया-भारत’ वर भाष्य नको | पुढारी

Sanatan controversy: सनातनवरील टीकेला जशास तसे उत्तर द्या- पंतप्रधानांचा आदेश; ‘इंडिया-भारत’ वर भाष्य नको

नवी दिल्ली; वृत्तसंस्था: सनातन धर्माचा अवमान करणार्‍यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी रविवारी सनातन धर्मावर टीका केली होती. यावरून वादाला तोंड फुटले आहे. भाजपने विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला टार्गेट केले आहे.

काँग्रेसने मात्र सर्व धर्म समान असून, प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार असल्याचे सांगून या घटनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला
आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मंत्री परिषदेत सनातनचा अवमान करणार्‍यांना जबाबदारीने चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधकांना सनातन धर्माच्या वास्तवाची माहिती करून द्यावी, असेही मोदी यांनी सांगितले आहे.

इंडिया-भारत नावावरून विरोधकांनी काहुर माजविले असले, तरी या विषयावर भाष्य न करण्याचेही मोदी यांनी मंत्र्यांना सांगितले. सनातनमधील प्रथा या डेंग्यू आणि मलेरियासारख्या असल्याने सनातनचे समूळ उच्चाटन करायला हवे, असे विधान उदयनिधी यांनी केले होेते. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित केलेले नाही. यातून केंद्र सरकारच्या सनातनी मनोवृत्तीचे दर्शन घडते, अशी टीकाही विरोधकांनी केली आहे.

Back to top button