Sanjay Raut : ‘सनातन’बाबत उदयनिधींचे वैयक्तिक मत असू शकते : संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : 'सनातन'बाबत उदयनिधींचे वैयक्तिक मत असू शकते : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “उदयनिधी स्टॅलिन हे मंत्री आहेत.  त्यांनी सनातन धर्माविराेधात केलेल्‍या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही. त्‍यांनी अशी विधाने करणे त्यांनी टाळावे. हे द्रमुकचे मत असू शकते किंवा त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.७) माध्यमांशी बोलताना सांगितले.(Sanjay Raut )

Sanjay Raut : विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही

संजय राऊत म्‍हणाले की, “उदयनिधी स्टॅलिन हे मंत्री आहेत. त्यांनी सनातन धर्माविराेधात केलेल्‍या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही. विधाने करणे त्यांनी टाळावे. हे द्रमुकचे मत असू शकते. किंवा त्यांचे वैयक्तिक मत. या देशात सुमारे ९० कोटी हिंदू राहतात आणि इतर धर्माचे लोकही या देशात राहतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत.” एम.के. स्टॅलिन हे आदरणीय नेते आहेत. संयमाने विधाने केली तर इंडिया आघाडीमध्‍ये काेणतेही मतभेद हाेणार नाही, असा विश्‍वासही राऊत यांनी व्‍यक्‍त केले.

उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले होते ? 

उदयनिधी स्टॅलिन हे एका कार्यक्रमात बाेलताना सनातन धर्माबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त वक्तव्यानंतर माेठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. शनिवारी (दि.२) चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात त्‍यांनी सनातन धर्मावर भाष्य केले होते. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली. ते म्हणाले होते की, “काही गोष्टींना विरोध करता येत नाही, फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला हे संपवायचे आहे. अशाप्रकारे सनातनला संपवायचे आहे, “सनातनाला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे,” त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या. या प्रकरणी त्यांच्यावर मंगळवारी (दि.६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनिधींनी केला हाेता वक्तव्यावर खुलासा

उदयनिधी यांनी शनिवारी (दि.२) चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात सनातन धर्मावर भाष्य केले होते. मात्र, नंतर त्यांनी आपल्या  ‘X’ खात्यावरुन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते, “मी सनातन धर्माचे पालन करणार्‍यांच्या नरसंहाराचे आवाहन केलेले नाही. सनातन धर्माचे पालन करणाऱ्या लोकांचा नरसंहार मी कधीही पुकारला नाही. सनातन धर्म हे धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणारे तत्व आहे. सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करणे म्हणजे मानवता आणि मानवी समता.होय. मी केलेल्या वक्तव्या संदर्भात ठाम आहे. मी सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे.” पुढे स्पष्टीकरण देत असताना ते म्हणाले की, “माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार आहे; मग ते न्यायालय असो किंवा लोकांच्या न्यायालयात”.

हेही वाचा 

Back to top button