Mission Moon : चांद्रयान 3 मोहिमेची संकल्पना, उद्देश आणि चांद्रयान 2 नंतरचे बदल

Mission Moon ISRO Chandrayan 3
Mission Moon ISRO Chandrayan 3

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mission Moon : चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी अवघा काही काळच बाकी राहिला आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण उत्सुकतेचा ठरणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या शेटवच्या टप्प्यात आलेल्या अपयशातून अनेक धडे इस्रोने घेतले. या अपयशाने खचून न जाता, मोहिमेतील चुकांचा अभ्यास केला. या अभ्यासातून इस्रोने चांद्रयान 3 मोहिमेत या चुका सुधारल्या आहेत. चांद्रयान 3 ही चांद्रयान 2 च्या पुढील मोहीम आहे. त्यामुळे ही मोहीम चांद्रयान 2 पेक्षा देखील अधिक आव्हानात्मक असणार आहे. यासाठी इस्रोने चांद्रयान 2 च्या अुनभवातून खूप महत्वाचे बदल देखील केले आहे. इस्रोने या मोहिमेसाठी केलेली तयारी आणि बदल यांची माहिती पुढारीच्या बहार पुरवणीतील लेखात ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. या माहितीतील महत्वाचा भाग इथे पुन्हा दिला आहे.

Mission Moon : 'चांद्रयान 3' संकल्पना आणि उद्देश

'चांद्रयान-3'साठी संकल्पना आणि उद्देश निश्चित करण्यात आले असून, या अभियानातून त्यांची पूर्तता केली जाणार आहे. अशाप्रकारची अपेक्षा बाळगण्यामागे अनेक कारणे आहेत. एक तर 'चांद्रयान-2'च्या अपयशाने मिळालेला धडा, दुसरे म्हणजे 'चांद्रयान-3'मध्ये 'चांद्रयान-2'च्या पार्श्वभूमीवर केलेले महत्त्वाचे बदल, नवीन अत्याधुनिक उपकरणांची रचना, तिसरे म्हणजे 'चांद्रयान-3'च्या प्राथमिक टप्प्यांतील सर्व चाचण्यांत आलेले समाधानकारक यश आणि शेवटी उपग्रह सोडण्याच्या बाबतीत जागतिक पातळीवर 'इस्रो'चा निर्माण झालेला दबदबा व महाबली म्हणजे सर्वाधिक वजनदार प्रक्षेपक 'जीएसएलएव्ही एम.के-3'ची प्रक्षेपण करण्याची क्षमता.

'चांद्रयान-2' लँडिंगच्या तयारीत असताना अपयशाची लागलेली ठेच ही अनेक शास्त्रज्ञांची मन दुखावणारी ठरली. तो दिवस कदाचित सर्वांनाच आठवत असेल. 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरण्यासाठी काही सेकंद बाकी होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयानाचा पृथ्वीवर असलेल्या स्थानकांशी संपर्क तुटला. लँडिंगपूर्वी लँडरच्या वेगाला नियंत्रित करता आले नाही आणि यान कोसळले. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीनदेखील चंद्राच्या दक्षिण धु्रवावर जाऊ शकले नाहीत.

'चांद्रयान-2' मोहीम यशस्वी झाली असती, तर चंद्राच्या दक्षिण धु्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता; पण या यशापासून आपण काही पावले वंचित राहिलो. या अपयशाने आपल्याला लँडरच्या गतीवरचे नियंत्रण, वजनासंबंधीचे अनेक तांत्रिक धडे मिळाले. त्यानंतर लँडरचे पाय चांगल्या तंत्रज्ञानाने आणखी विकसित करता येऊ शकतात, हे लक्षात आले. यंदाच्या मोहिमेमध्ये 'चांद्रयान-2'प्रमाणे कटू अनुभव येणार नाहीत, असा विश्वास आहे. कारण, इस्रोने गेल्या वेळचा धडा घेत 'चांद्रयान-3'मध्ये अनेक बदल केले आहेत.

Mission Moon : 'चांद्रयान 3' मध्ये केलेले महत्वाचे बदल

'चांद्रयान-2'चे लँडर 'विक्रम' यात एकूण पाच इंजिन होती. 'चांद्रयान-3'मध्ये चारच इंजिन आहेत. 'चांद्रयान-2'मध्ये दोन्ही बाजूंनी दोन इंजिनबरोबर एक इंजिन बसविलेले होते आणि ते आता वगळण्यात आले आहे. याशिवाय लँडरच्या पायाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागावर सहजपणे उतरता येईल आणि तो मजबुतीने उभा राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लँडरमध्ये अत्याधुनिक प्रकारचे 'लँडर डॉप्लर वलोसीमीटर' बसवण्यात आले आहे. यावरून त्याच्या चालीचे बारकाईने आकलन करणे आणि त्याच्या गतीवर सहजपणे नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. या बदलामुळे अभियानाचा खर्च हा सव्वासहा हजार कोटींवरून 9 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, त्यापासून मिळणार्‍या लाभाच्या तुलनेत हा खर्च अधिक नाही, असे म्हणता येईल.

आणखी एक गोष्ट म्हणजे, यावेळी 'चांद्रयान-3'बरोबर लँडर आणि रोवर आहेतच; परंतु ऑर्बिटर नसेल. 'चांद्रयान-2'चा ऑर्बिटर अजूनही चंद्राभोवती फिरत असून, तो 'चांद्रयान-3'साठी कामाला येईल.

Mission Moon : …तर 'चांद्रयान 3' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अचूक लँडिंग करेल

मोहिमेदरम्यान रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच आर. एफ. कम्युनिकेशन लिंक कायम राहील तसेच ऑर्बिटर, लँडर आणि रोवर हे सतत संपर्कात राहतील, याची दक्षता घेतली जात आहे. एवढेच नाही, तर एक अतिरिक्त प्रायोगिक उपकरण चंद्राच्या कक्षेपासून ते पृथ्वीच्या कक्षेपर्यंत स्पेक्ट्रो धु्रवीयमितीय परिणामाचे आकलन करणार आहे. त्याचीही चाचणी करण्यात आली असून, आणखी चांगले एल्गोरिदम तयार करण्याबरोबरच त्याच्या अपयशाच्या वेळी काय करावे लागेल, या सर्व गोष्टींचे आकलन केले आहे. लँडर आणि रोवरला अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे बसविली आहेत. आता केवळ प्रक्षेपणाची वाट पाहिली जात आहे. आजमितीला सर्व चाचण्या आणि परीक्षणाचे आकलन केल्यास एखादी दुर्दैवी घटना घडली नाही, तर 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण धु्रवावर अचूक लँडिंग करत आपला प्राथमिक उद्देश साध्य करेल.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news