श्रीहरिकोटा; वृत्तसंस्था : 'चांद्रयान-3' मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू झालेले असून, बहुतांश सर्वच पूर्वतयारी झालेली आहे. इतिहासाच्या पानावर एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज आहे. येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून येत्या शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता 'चांद्रयान-3'चे प्रक्षेपण होईल.
चार वर्षांपूर्वी 'चांद्रयान-2' मोहिमेच्या मर्यादित यशाने भारतीयांची निराशा केली होती. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लँडर कोसळले होते. 'चांद्रयान-2'मध्ये ज्या-ज्या कारणांमुळे हा अपघात घडला, त्या-त्या सर्व कारणांना केंद्रस्थानी मानून आवश्यक त्या सर्व सुधारणांसह 'चांद्रयान-3' मोहीम आखण्यात आली आहे. यशाची आशा यावेळी आकाशाएवढी आहे, असे 'इस्रो' या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.
विक्रम लँडर चंद्रावर उतरताच भारत असे यश मिळविणार्या अमेरिका, रशिया, चीन या महासत्तांच्या यादीत जाऊन धडकेल. भारताची ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील संशोधनासाठी असल्याने तिन्ही महासत्तांसह अवघ्या जगाच्या कुतुहलाचा विषय ती ठरलेली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजतागायत कुठल्याही देशाचे यान उतरलेले नाही. त्यामुळे भारतीयांचे लक्ष जसे चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाकडे आहे, तसेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे आहे!
यानाच्या प्रक्षेपणानंतर 23 अथवा 24 ऑगस्ट रोजी विक्रम लँडरचे चंद्रावर लँडिंग ठरलेले आहे. इस्रोने, अपयशाधारित दृष्टिकोणाची (फेल्युअर बेस्ड प्रोच) चांद्रयान-3 साठी केलेली निवड सार्थ ठरावी म्हणून अवघा देश आतापासून उत्सुक आहे.