Chandrayaan-3 : चंद्रावर कसे पोहोचणार चांद्रयान-3, जाणून घ्या… | पुढारी

Chandrayaan-3 : चंद्रावर कसे पोहोचणार चांद्रयान-3, जाणून घ्या...

श्रीहरीकोटा; वृत्तसंस्था : चांद्रयान-2 च्या मर्यादित यशाने खचून न जाता भारताने चांद्रयान-3 ही 700 कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता चांद्रयान-3 प्रक्षेपित केले जाईल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे यश मिळविणारा भारत हा चौथा देश ठरेल. (Chandrayaan-3)

चंद्रावर लँडिंग धोकादायक कारण…

मंगळ हा चंद्रापेक्षा पृथ्वीपासून कितीतरी लांब आहे, याउपर तेथे लँडिंग सोपे आहे. कारण मंगळावर वातावरण आहे. चंद्रावर लँडिंग कठीण यासाठी, की येथे वातावरण नाही. वातावरण नसल्याने चंद्रावर उतरण्यासाठी प्रॉपेलंटचा (प्रणोदक) वापर केला जातो. ते मर्यादित प्रमाणातच नेता येते.

पृथ्वीवर जीपीएसच्या मदतीने लोकेशनची माहिती मिळते. चंद्रावर लोकेशन दाखविणारे सॅटेलाईट नाही. त्यामुळे लोकेशनही कळत नाही आणि पृष्ठभागापासूनचे अंतरही कळत नाही.

संबंधित बातम्या

चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. इथे सूर्य फक्त क्षितिजालगत असतो. त्यामुळे मोठाल्या सावल्या पडतात. काहीही नीट दिसत नाही. (Chandrayaan-3)

तीन आव्हाने

1) लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग
2) चंद्राच्या पृष्ठभागावरून रोव्हर चालविणे
3) चंद्रावरील विविध घटकांचे वैज्ञानिक परीक्षण

chandrayaan 3

एलव्हीएम 3 बद्दल…

  • यान नेणारे एलव्हीएम 3 रॉकेट हे देशाचे सर्वात अवजड रॉकेट
  • वजन 640 टन, लांबी 43.5 मीटर
  • चांद्रयानाचे एकूण पेलोड जवळपास 3 टन

chandrayaan 3

चांद्रयान-3 चे महत्त्व काय?

  • चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही.
  • चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.
  • अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या द़ृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर

  • 3.84 लाख कि.मी. आहे. ते पार करायला 45 ते 48 दिवस यानाला लागतील.
  • एलएमव्ही 3 ने यान पृथ्वीच्या कक्षेत पाठविले जाईल. ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि याबरोबरच आपल्या प्रदक्षिणेचा परिघ वाढवत राहील.
  • आणि यादरम्यान एका क्षणी ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राला प्रदक्षिणा घालणे सुरू करेल. लँडर आपला परीघ लहान करत करत एका क्षणी चंद्रावर लँडिंग करेल.

chandrayaan 3

घटनाक्रम

चांद्रयान-1

15 ऑगस्ट 2003 : 2008 आधी भारत चंद्रावर आपले यान पाठवेल, अशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली.
22 ऑक्टोबर 2008 : सतीश धवन स्पेस स्टेशनवरून चांद्रयान 1 प्रक्षेपित झाले.
8 नोव्हेंबर 2008 : चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले व स्थिरावले.
14 नोव्हेंबर 2008 : स्पेसक्राफ्टच्या मदतीने एक मुन इम्पॅक्ट प्रोब चंद्रावर कोसळेल अशा बेताने लँड केले.
सप्टेंबर 2009 : यातून उपलब्ध झालेल्या डेटाच्या आधारे नासाने चंद्रावर पाणी असल्याचा निष्कर्ष काढला.
29 ऑगस्ट 2009 : यानाने वर्षभरात चंद्राभोवती 3400 प्रदक्षिणा घातल्या आणि नमूद तारखेस यानाशी कायमचा संपर्क तुटला.

चांद्रयान-2

22 जुलै 2019 : चांद्रयान-2 लाँच झाले.
20 ऑगस्ट 2019 : चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
6 सप्टेंबर 2019 : विक्रम लँडरची सॉफ्टलँडिंग सुरू झाली, पण संपर्क तुटला. अर्थात ऑर्बिटर अद्यापही चंद्राच्या कक्षेत फिरत आहे व डेटा संकलन करत आहे. चंद्रावर उतरताना विक्रमचा वेग सेकंदाला 1683 मीटरवरून सेंकदाला 146 मीटर करण्यात आला. यादरम्यान ब्रेकिंग सिस्टिममध्ये बिघाड झाला. इस्रो प्रमुख सिवन यांना रडू कोसळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धीर दिला.

Back to top button