

पुढारी ऑनलाईन : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो' 'चांद्रयान-३' (Chandrayaan-3) मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. 'चांद्रयान-३' मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू झालेले असून, बहुतांश सर्वच पूर्वतयारी झालेली आहे. इतिहासाच्या पानावर एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता 'चांद्रयान-३'चे प्रक्षेपण होईल. भारताचे 'बाहुबली' (Bahubali Rocket) रॉकेट आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर उंच उभे आहे आणि भारताच्या चांद्रयान-३ उपग्रहाला चंद्राकडे नेण्याच्या प्रतीक्षेत आहे.
भारतीय लोककथांमध्ये चंद्राला अनेकदा 'चांदोमामा'- प्रेमळ काका म्हणून संबोधले जाते आणि इतर संस्कृतींमध्ये आर्टेमिस ही देवी म्हणून चंद्राची अवतार मानली जाते. मिशन चांद्रयान ही चंद्रावर पोहोचण्याची भारताची स्वदेशी मोहीम आहे. आर्टेमिस मोहिमेतर्गंत २१व्या शतकात चंद्रावर परत जाण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. नासाची आर्टेमिस-१ ही मोहीम मंगळ मोहिमेनंतरची महत्त्वाची मोहीम आहे.
चांद्रयान-३ ही चंद्रावरची भारताची तिसरी मोहीम आहे. या मोहिमेच्या सुमारे चार लाख किलोमीटरच्या प्रवासात ३,९२१ किलो वजनाचा उपग्रह सोडण्यात येणार आहे. हे अपग्रेडेड 'बाहुबली' रॉकेट, ज्याला आता लॉन्च व्हेईकल मार्क ३ (LM-3) असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन ६४२ टन आहे, जे सुमारे १३० पूर्ण वाढ झालेल्या आशियाई हत्तींच्या एकत्रित वजनाएवढे आहे. हे ४३.५ मीटर उंच विशाल रॉकेट आहे, जे ७२ मीटर उंच असलेल्या कुतूब मिनारच्या निम्म्याहून अधिक उंचीचे आहे.
या रॉकेटचे हे सहावे उड्डाण असेल. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राला ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री आहे. चंद्रयान-३ ही एक धाडसी वैज्ञानिक मोहीम आहे ज्याचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे करणे आहे. त्यात सात वैज्ञानिक उपकरणे देखील आहेत, जर भारत या मोहिमेत यशस्वी झाला तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा रशिया, अमेरिका आणि चीन नंतर चौथा देश बनणार आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष श्री एस सोमनाथ यांनी सांगितले.
SUV आकाराचा उपग्रह मुख्यतः एक मोठा प्रोपल्शन मॉड्यूल आहे जो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या कक्षेत नेईल. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर, सर्वात लवकर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न २३ ऑगस्ट रोजी केला जाईल. भारताला चंद्रावरील मातीचे विश्लेषण करण्याची, चंद्राच्या पृष्ठभागाभोवती फिरण्याची उत्सुकता आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली तर, चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा राष्ट्रध्वज दाखवणारा पहिला भारतीय सेल्फी आपण पाहू शकणार आहोत.
चंद्राला स्पर्श करण्याचे अपूर्ण राहिलेले ते स्वप्न यावेळी पूर्ण व्हावे म्हणून 'इस्रो'ने कुठलीही कसर सोडलेली नाही. चांद्रयान-१ पूर्णपणे यशस्वी ठरलेले होते. त्यामुळे चांद्रयान-२ ही पूर्वयशावर आधारलेली मोहीम होती; पण तिला मर्यादित यश मिळाले. आपण चंद्रावर स्थिरावू शकलो नाही. त्यामुळे चांद्रयान-३ ही मोहीम चांद्रयानच्या अपयशावर (मर्यादित) आधारलेली आहे. ज्या-ज्या कारणांनी हे अपयश आले, त्या-त्या कारणांचे सखोल अध्ययन 'इस्रो'ने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) केले आणि आनुषंगिक बदल नव्या मोहिमेत केलेले आहेत. (Chandrayaan-3)
हे ही वाचा :