चिपळूण / मंडणगड, पुढारी वृत्तसेवा : युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या धमाक्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेले देशभरातील हजारो विद्यार्थी भयभीत झाले. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. युक्रेनमध्ये एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना युक्रेन बाहेर काढण्यात येत आहे. हंगेरी व रुमानिया येथील विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने त्यांना भारतात आणण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी भरलेल्या अशा अनेक बस आज (दि.२६) सकाळी युक्रेन (Ukraine) मधून हंगेरीकडे रवाना झाल्या आहेत, अशी माहिती युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या चिपळुणातील ऋषभनाथ राजेंद्र मोलाज व मंडणगड येथील आकाश कोबनाक या विद्यार्थ्यांनी दिली.
युक्रेनमध्ये (Ukraine) जिल्ह्यातील ८ विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्ट्रातील १४ ते १५ विद्यार्थी आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश कर्नाटक, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आदी राज्यातील विद्यार्थी त्यांच्या बरोबर आहेत. ८ ते १० बस या विद्यार्थ्यांना घेऊन युक्रेनच्या हद्दीबाहेर रवाना झाल्या आहेत.
युक्रेनच्या व हंगेरीच्या सीमेवर या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट घेण्यात आले. व त्यांची सर्व तपासणी करण्यात आली. त्यानंतर हंगेरी येथील विमानतळावर या विद्यार्थ्यांना नेण्यात येणार आहे. तेथून भारताचे विमान विद्यार्थ्यांना घेऊन देशात परतणार आहे, अशी माहिती त्यांच्या पालकांनी दिली. सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थी असल्याने टप्प्याटप्प्याने विद्यार्थी भारतात परतणार आहेत.
गेले तीन दिवस हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वस्तीगृहात भीतीच्या छायेखाली होते . पालकांना फोन लागत नव्हते. वीज नसल्याने मोबाईलचे चार्जिंग संपले होते. मात्र, आता हे विद्यार्थी बसमधून युक्रेनच्या बाहेर पडत आहेत. तीन दिवसानंतर पालकांचा व्हिडिओ कॉल झाला आहे. त्यामुळे आता पालकांचा जीव भांड्यात पडला आहे, असे पालकांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले.
या विद्यार्थ्यांनी देखील आता आमची काळजी करू नका. आम्ही सुखरूप आहोत. ज्यावेळी भारतात परतण्यासाठी विमानात बसू, त्या आधी फोन करू, असे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकही थोडे निश्चित झाले आहेत.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतातील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. येथील एका विद्यापीठातून अनेक भारतीय विद्यार्थी बसने हंगेरी येथे आणले जात आहेत. तेथून ते विमानाने भारतात परतणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या बसच्या दर्शनी भागात तिरंगा लावण्यात आला आहे.
याशिवाय बसच्या काचेवर 'इंडियन स्टुडन्ट' असा फलक देखील लावण्यात आला आहे. युक्रेनमधून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी ही काळजी घेण्यात आली असून हे विद्यार्थी सुखरूप पणे हंगेरी येथे पोहोचणार आहेत . Uzhhorod नॅशनल युनिव्हर्सिटी चे हे भारतीय विद्यार्थी आहेत. पालकांनी काळजी करू नका, असे मुलांनी कळविले आहे.
हेही वाचलंत का ?