इचलकरंजीत महावितरण अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडला साप, स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक | पुढारी

इचलकरंजीत महावितरण अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडला साप, स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : शेतीसाठी दिवसात दहा तास वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी सर्व ठिकाणी स्वभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत असताना इचलकरंजीत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलावरच साप सोडल्याने तारांबळा उडाली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेच चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी जोरजोरात घोषणा देत कार्यकारी अभियंता राठी यांना घेराव घातला. या प्रकारची माहिती मिळताच महावितरण कार्यालयात पोलिसही दाखल झाले.

दिवसा वीज पुरवठ्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास लेखी स्वरुपात दिल्यानंतर कार्यकर्ते शांत होत कार्यालयामधून निघून गेले.

दरम्यान, स्वभिमानी शेतकरी संघटनेतील तिघांच्यावर शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

महावितरण शिरोळमध्येही अज्ञातांनी सोडले साप

शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा महावितरण कार्यालयातील सावळागोंधळ थांबवावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक धोरण घेतले आहे. दरम्यान शुक्रवारी काही अज्ञातांनी तहसील कार्यालयात साप सोडले. परंतु साप किती सोडले आहेत याबद्दलची माहिती मिळून आली नाही.

शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाला दिवसा वीज मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर चार दिवसा पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलना दरम्यान, शेट्टी यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना रात्रीच्या वेळी पाणी पाजत असताना वन्य प्राण्यांचा होणारा त्रास आणि शेतकऱ्याला असणारा धोका यावर खास करून जोर धरला आहे.

Back to top button