Pune news : मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!

Pune news : मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!
Published on
Updated on

पुणे : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात 'सारथी' ही खर्‍या अर्थाने प्रगतीची सारथी बनली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी, उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती, कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत.

1 लाख 33 हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ

राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच्. डी. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107, तर शिक्षण विभागांतर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. कौशल्यविकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना, तर 'सारथी'च्या इतर उपक्रमांतर्गत 60 हजार 140 जणांना फायदा झाला आहे.

शिष्यवृत्ती योजना

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 2022-23 अंतर्गत एकूण 31 कोटी 23 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. यासाठी इयत्ता 9 वी व 11 वीमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावीमध्ये 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेकडून वरील अटींसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रुपयांप्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

स्पर्धा परीक्षा विभाग

'सारथी'मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत, या तिन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण साहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग सक्रिय आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रुपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क 'सारथी'मार्फत भरण्यात येते.

राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन

यूपीएससीप्रमाणेच राज्य सेवा परीक्षा अर्थात एमपीएससीमध्येही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एमपीएससी प्रशिक्षणासाठी साडेसातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क 'सारथी'मार्फत भरण्यात येते.

उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहिरात जुलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यातील 153 पात्र विद्यार्थ्यांची यादी 'सारथी'च्या संकेतस्थळावर या वर्षी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरू करण्यात येत असून, चार जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.

शेतकरी प्रशिक्षण

2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबविण्यात येते. यामध्ये फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेडनेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रवेशासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसीस्तरावर सुरू असून, ऑक्टोबर 2023 पासून राज्यातील 26 ठिकाणी प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येईल.

कौशल्यविकास प्रशिक्षण

या कार्यक्रमांतर्गत 35 क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्यविकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे प्रयोजन आहे. संस्थेमार्फत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्यविकास प्रशिक्षण सुरू करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.

विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना

कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम : 2022-23 मध्ये सारथीमार्फत श्रीमंत मालोजीराजे-सारथी इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब—ुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news