Pune News : आयटी क्षेत्रात मराठी तरुणांचा डंका; तमिळनाडू, आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्राची आघाडी

Pune News : आयटी क्षेत्रात मराठी तरुणांचा डंका; तमिळनाडू, आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्राची आघाडी
पुणे : जागतिक आयटी क्षेत्रात मराठी तरुणांचा टक्का वाढत चालला आहे. देशाच्या तुलनेत मराठी तरुणांचे प्रमाण तीन टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर गेल्याने ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. अल्प काळात आयटीत मराठी तरुणांनी बाजी मारली आहे.
दैनंदिन व्यवसायातदेखील आता आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललेला आहे. पीजी, लॉन्ड्री, मेस, कॅब, हॉटेल, टपरी, कॅफे, किराणा, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, बेकरीसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरविणार्‍या व्यावसायिकांना आयटीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आयटीच्या सुविधा पोहोचत आहेत. अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रिलिया, या देशात आता मराठी आयटी तरुणांचा टक्का वाढत आहे.
माहिती तंत्रज्ञानात काही ठराविक देशांची मक्तेदारी मोडीत निघत असून तमिळनाडू, आंध्र प्रदेश, नंतर आता महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.  प्रोग्रॅमिंग लँग्वेज , क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेव्हऑप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डेटा सायंटिस्ट, क्लाऊड आर्किटेक्ट  ब्लॉकचेन इंजिनीअरमध्ये मराठी तरुण पंसती देत आहेत.
एकट्या पुण्यात तब्बल सहाशे आयटीच्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत. या कंपन्यांमध्ये आठ ते दहा लाख तरुणांना रोजगार निर्माण झालेला आहे.  यामध्ये मराठी तरुणांचा टक्का सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.  एकट्या हिंजवडीमध्ये तब्बल चार लाख तरुण नोकरीनिमित्त ये-जा करीत आहेत.
आयटी क्षेत्रामध्ये  डेव्हलपर, लीड कन्सल्टंट, सेलफोर्स डेव्हलपर आणि साईट रिलायबिलिटी इंजिनियर या पदांसाठी 150 ते 300 टक्के मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, केवळ नोकर्‍यांची संख्या वाढली आहे असं नाही, तर कित्येक कंपन्या मागील वर्षीच्या तुलनेत नवीन जॉईन होणार्‍यांना अधिक चांगले पॅकेज देत आहेत. तसेच, आधीपासून काम करत असणार्‍यांना कित्येक कंपन्या  70 ते 120 टक्के पगारवाढ देत आहेत. गेल्या वर्षापर्यंत या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना केवळ 20 ते 30 टक्के पगारवाढ देत होत्या. आता त्यांनी पगारवाढदेखील वाढविली आहे.

..स्कील वाढल्यास आणखी संधी

विद्यार्थ्यांनी आपले स्कील वाढविण्यावर भर दिला पाहिजे. हे स्कील वाढल्यास निश्चितपणे आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन भाषा शिकणे, जगाची भ्रमंती, प्रशिक्षण आदी बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास आणखी मराठी तरुणांसाठी संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. पुण्यात आयटी हब तयार होत आहे. मराठी तरुणांची यामुळे एक वेगळी ओळख तयार होत आहे. हळूहळू हा टक्का वाढत जाईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
–  डॉ. दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news