Kolhapur Ganesh Chaturthi | कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! गणेश मिरवणुकीत रशियन डीजेची एन्ट्री

Kolhapur Ganesh Chaturthi | कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! गणेश मिरवणुकीत रशियन डीजेची एन्ट्री
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजर… नेत्रदीपक आतषबाजी, रिमझिम पावसाच्या बरसातीत डीजेच्या दणदणटावर थिरकणारी तरुणाई… अशा उत्साही व जल्लोषी वातावरणात मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणुकीने राजारामपुरी परिसरातील तरुण मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. रशियन डीजे लिंडाने रीमिक्स हिंदी गीतांवर तरुणाईला ठेका धरायला भाग पाडले. (Kolhapur Ganesh Chaturthi)

सायंकाळी पाच वाजल्यापासून तरुण मंडळांच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीला राजारामपुरी जनता बाजार चौकातून प्रारंभ झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदा लेसर शो व पारंपरिक वाद्यांचा दणदणाट हे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. अनेक महिला व युवती फेटे बांधून विशिष्ट वेषभूषेत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हलगीच्या कडकडाटावर त्यांनी ठेका धरला होता. भर पावसात त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

आगमन मिरवणुकीत काही मंडळांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर देखावे तयार केले होते. राजारामपुरी 9 नंबर शाळेपासून महापालिकेच्या जगदाळे हॉलपर्यंत, तिथून जनता बाजार चौक ते पुन्हा राजारामपुरी 12 वी गल्ली असा मिरवणुकीचा मार्ग होता. लेसर शोमुळे राजारामपुरी परिसर झगमगून गेला होता. मराठी, हिंदी गीतांवर तरुणाईने तर 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गीतावर बालचमूंनीही ठेका धरला. मिरवणूक मार्गावर विविध राजकीय पक्षांच्या वतीने तरुण मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. अनेक राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मंडळांना भेटी दिल्या.

राजारामपुरी जनता बाजार येथील शिवप्रेमी तरुण मंडळाच्या रशियन डीजे लिंडाने हिंदी गीतांवर तरुणाईला थिरकवले. डीजेचा ताबा घेत तिने 'कसं काय कोल्हापूर' असे म्हणत तरुणाईला साद घातली. डॉन, तेजाब, मोहरा चित्रपटातील रीमिक्स गितांच्या तालावर लिंडाने तरुणाईला ठेका धरायला भाग पाडले. दोन तासांहून अधिक काळ तिने रीमिक्सचा ताल सोडला नव्हता. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरळीत पार पडल्या. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मिरवणूक मार्गाची पहाणी केली. (Kolhapur Ganesh Chaturthi)

ध्वनिमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन

मिरवणुकीत अनेक तरुण मंडळांकडून साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. मंडळाच्या ठिकाणी जाऊन पोलिस जाऊन आवाज मर्यादेची तपासणी करत होते. तसेच ध्वनिमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन स्पीकरवरून पोलिस प्रशासनाकडूनन करण्यात येत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news