खेड; विजय सोनवणे : संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत, लोकांची आर्थिक फसवणूक, खंडणी तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा याचे 'कर्जत कनेक्शन' उघडकीस आले आहे. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथेही मनोहरमामाने स्वतःच्या नावावर 9 एकर 2 गुंठ्यांची जमीन अतिशय कमी किमतीत खरेदी केली असल्याचे उघड झाले.
कर्करोग बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत दोन लाख 51 हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहरमामा व त्याच्या अन्य दोन साथीदारांवर विविध कलमांद्वारे बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा पोलिस ठाण्यातही महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. लोकांचे भविष्य सांगताना संत बाळूमांच्या नावाने मनोहरमामाने करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता जमविली आहे. आता कर्जत तालुक्यातील चिलवडी येथेही मनोहरमामाने स्वतःच्या नावावर 9 एकर 2 गुंठ्यांची जमीन खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे.
खरेदी केलेल्या 3 हेक्टर 62 आर क्षेत्राची सरकारी खरेदी किंमत 21 लाख 85 हजार रुपये एवढी आहे. ही खरेदी 30 एप्रिल 2019 रोजी करण्यात आलेली आहे. खरेदीची ही सरकारी किंमत जरी कमी असली तरी, प्रत्यक्षात ही रक्कम किती असेल, याबद्दल कुणाला आश्चर्य वाटायला नको.
राज्यात गाजत असलेल्या मनोहर भोसले याने लोकांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांचा खासगी डेटा गोळा केला आहे. एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवित, तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावा क्रांतिकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे.
दरम्यान, अनेक मातब्बर राजकीय बड्या हस्तींचे मनोहर मामासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आणखीनच भर पडली आहे.
मनोहर भोसले हा 2013 सालापर्यंत झोपडीत राहत होता. त्यानंतर त्याच्या संपत्तीत होत गेलेली वाढ, ही सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. स्वतःच्या नावावर कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे 9 एकर जमीन, तसेच पत्नीच्या नावावर 27 एकर जमीन, करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे दीड एकर जमीन, एक हजार स्क्वेअर फुटाचा बंगला, मठ, तर बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजुबावी येथे एक मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट, पाणी, संरक्षक भिंती, असा खर्च कुठून येतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनोहर भोसले याने रजिस्टर केलेली शिवसिद्धी संचालित मामा संस्था ही बारामतीत रजिस्टर असताना, देणग्या मात्र उंदरगाव येथे गोळा केल्या जात आहेत. शिवाय, या देणग्या कशासाठी गोळा केल्या जात आहेत? याचे कारण पावतीवर नमूद केले जात नसल्याचे प्रश्न क्रांतिकारी आवाज संघटनेने व्यक्त केले आहेत.
मनोहर भोसले उर्फ मनोहरमामा याने काही मराठी टीव्ही मालिकांसाठी आर्थिक मदत पुरविली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा निर्माता संतोष गजानन आयचित हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर असल्याची माहिती समोर येत आहे. बारामती येथील गुन्ह्यात जप्त केलेली गाडी ही संतोष आयचित याच्याच नावावर असल्याचे पुढे आले आहे.