पुढारी ऑनलाईन डेस्क एकनाथ शिंदे (Maharashtra Political Crisis) यांच्या नेतृत्त्वाखाली बंड केलेल्या आमदार व मंत्र्यांच्या गटाने आता आसाम मधील गुवाहटी सोडले असूनण ते गोव्याकडे येण्यास रवाना झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला गुरुवारी (दि.३०) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या विश्वासदर्शक चाचणीसाठी हे बंडखोर हजर राहणार आहेत. यामुळेच हे बंडखोर आमदार बुधवारी गोव्यात येत असून ते गुरुवारी मुंबई हजर राहण्याची शक्यता आहे.
आसाम सोडण्याच्या आधी गुवाहटीच्या विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक चाचणीस आमच्या आमदारांचा गट सहभागी होणार आहे. यानंतर आम्ही आमच्या आमदारांच्या गटाची बैठक देखिल घेऊ असे शिंदे म्हणाले. शिंदे पुढे म्हणाले, आम्ही शिवसेनेचे आहोत आम्ही शिवसैनिकच आहोत. जे सरकार येईल ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार सत्तेवर येईल. (Maharashtra Political Crisis)
दरम्यान मंगळवारी रात्री विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून त्यांची बहुमत चाचणी घेण्यात यावी, अशा विनंतीचे पत्र दिले होते. यानंतर बुधवारी (दि.२९) राज्यपालांनी ३० जून रोजी विशेष विधानसभेचे अधिवेशन बोलावून महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. आता ३० जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे ३७ हून अधिक आमदारांनी बंड केले आहे. तसेच या गटाला अपक्ष आमदारांचा देखिल पाठिंबा आहे. हे बंडखोर आमदार देखिल बहुमत चाचणी वेळी विधानसभेत हजर राहणार आहेत. मात्र त्यांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करु शकेल का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political Crisis)
दरम्यान बहुमत चाचणीसाठी मुंबईत हे बंडखोर आमदार गुरुवारी येणार आहेत. त्या आधी ते आसाम वरुन गोव्याकडे येण्यास निघाले आहेत. त्यानंतर ते गुरुवारी गोव्यातून मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट आसामहून गोव्याकडे येण्यास निघाला आहे.