लोणंद; पुढारी वृतसेवा : लोणंद- निंबोडी रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर चाकुने वार केला. वार केल्यानंतर त्यांनी तृप्ती यांच्या गळ्यातील मंगळसुत्र, पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. या प्रकाराने लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे.
माहिती अशी की, तृप्ती घाडगे या निंबोडी रोडवरील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मिटिंगसाठी स्कुटी क्र. mH11- Bj-9241 वरून निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा विनानंबरच्या मोटरसायकलवरील तीन युवकांनी पाठलाग केला. त्यांना दोनवेळा ओव्हरटेक करुन निंबोडी रस्त्याच्या चढावर पुढे जाऊन गाडी थांबवली. तिघांपैकी एकाने हातात चाकू घेवून घाडगे यांना थांबण्यास भाग पाडले. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेतले. गाडीला अडकवलेला मोबाईल, रोख रक्कम असलेली पर्स ओढली. यावेळी प्रतिकार करताना हातावर चोरट्याने चाकूचा वार केला. चोरटे पळून जाताना चोरट्यांचा स्कुटीवरून सुमारे 100 मिटर पाठलाग केला. परंतु यावेळी रस्तावर कोणीच नसल्याने चोरटे निंबोडी फाट्या नजीकच्या रस्त्याने कापडगावच्या दिशेने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व सहकारी, घटनास्थळी दाखल झाले. तृप्ती घाडगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हेही वाचा