Sushma Andhare : ‘गुलाबराव तुमच्या पराभवाचं कारण सुषमा अंधारे असेल’, वादग्रस्त वक्त्यव्यावर अंधारे यांचे सडेतोड प्रत्युत्तर | पुढारी

Sushma Andhare : 'गुलाबराव तुमच्या पराभवाचं कारण सुषमा अंधारे असेल', वादग्रस्त वक्त्यव्यावर अंधारे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ”मी बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळणार नाही, मी बरोबरीची लढाई करण्यामध्ये विश्वास ठेवते. गुलाबराव तुमचा सरंजामी माज मी संवैधानिक पद्धतीने उतरवेन” असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. वाचा नेमक काय आहे प्रकरण.

Sushma Andhare : सुषमा अंधारें ‘नटी’ – गुलाबराव पाटील

गेले काही दिवस मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Raghunath Patil) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांच्यात वाद सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काल (दि.६) गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला . पुढे ते असेही म्हणाले “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती”. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांनीही गुलाबराव पाटील यांच्या या विधानाला सडेतोड उत्तर दिले आहे.

बाईपणाचं विक्टिम कार्ड खेळणार नाही

गुलाबराव यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत उत्तर दिले आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्या पातळीवर मी निश्चित उतरु शकत नाही, जी भाषा ते वापरत आहेत तो त्यांच्या संस्कारांचा परिणाम आहे; गुलाबराव तुम्ही जी सवंग आणि अश्लाघ्य टिपण्णी करून मला नामोहरम करण्याचा, बाईपणावर हल्ला करण्याचा जो काही बालिश प्रयत्न करत आहात त्यावरून मला तुमच्या बालिशपणाची कीव येते. मी बाई पणाचं विक्टिम कार्ड खेळणार नाही, मी बरोबरीची लढाई करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवते गुलाबराव. गुलाबराव तुमचा सरंजामी माज मी संवैधानिक पद्धतीने उतरवेन. ‘येणाऱ्या काळात तुमच्या पराभवाचं कोणतं कारण असेल, तर ते सुषमा अंधारे असेल,’ असही त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांचा हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी  रिट्विट केला आहे.

हेही वाचा

 

Back to top button