Shrikant Shinde : आणखी काही आमदार-खासदार आमच्या संपर्कात! श्रीकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. तसेच मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नयेत, यासाठी सुरू केलेला टाईमपास असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. (Shrikant Shinde)
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज डोंबिवलीच्या काटई गावात तुळशी विवाह सोहळ्यासाठी आले होते. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. खा. श्रीकांत शिंदे यांना याबाबत विचारला असता, महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर सरकार मिळाले आहे. त्यामध्ये शिल्लक आमदार कुठे जाऊ नयेत, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच हे सरकार गेल्या ३ महिन्यात ज्या पद्धतीने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. ते पाहता २ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत यांची काय परिस्थिती होईल? याचा विचार करून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. (Shrikant Shinde)
त्यामुळे हे मध्यावधी निवडणुकीचं भूत समोर आणलं जात असल्याची टीका खा. श्रीकांत शिंदेंनी केली. काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आमचा आकडा किती वाढतो, हे येणाऱ्या काळात कळेलच, सगळ्यांचे आमदार आमच्या संपर्कात असून सगळ्या गोष्टी आत्ताच सांगता येणार नाहीत, असं म्हणत थोडा धीर धरा, सबर रखो.. असं वक्तव्य खा. श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा;