पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमधील खेरसन शहरातून रशियाने लष्कार माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत. ही घोषणा युक्रेन-रशिया युद्ध समाप्तीची सुरुवात आहे, असे सूचक विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. यावेळी त्यांनी खेरसन शहरात सैनिकांचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी घेतल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. ( Ukraine President Zelenskyy )
सोमवार १४ नोव्हेंबर रोजी झेलेन्स्की खेरसन शहराच्या रस्त्यांवर फिरले. त्यांनी खेरसनमधील मध्यवर्ती चौकात युक्रेनियन सैनिकांना पदकांचे वाटप केले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढले. दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी झेलेन्स्कीच्या खेरसनच्या भेटीवर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले तुम्हाला माहित आहे की हा रशियन फेडरेशनचा प्रदेश आहे.
युक्रेनमधील खेरसन शहरातून लष्काराने माघार घ्यावी, असा आदेश रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी मागील आठवड्यात दिला होता. रशियाने खेरसन येथे नियुक्त किरील सट्रेमोसोव्ही यांचे कार अपघातात निधन झाले. यानंतर अवघ्या काही तासांमध्येच ही घोषणा करण्यात आली होती.. रशिया-युक्रेन युद्धातील गेल्या ९ महिन्यांमधील हे एक महत्त्वाचे वळण मानले जात होते.
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यावेळी खेरसन शहर रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. नुकतेच वृत्तवाहिन्यांशी बोलताना रशियाचे जनरल सर्गेई सुरोविकिन यांनी म्हटलं होते की, आम्हाला खेरसन शहरात असणाऱ्या सैनिकांना पुरवठा करणे आता शक्य नाही. तसेच येथील रशियन सैनिकांचे प्राण वाचवणे याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही असे निर्णय घेणार आहोत ज्यामुळे आपली लष्करी युनिटची क्षमता अबाधित राहिल. त्यामुळे आता खेरसनमध्ये सैनिक ठेवणे व्यर्थ ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा :