G20 summit | अमेरिका-चीनमधील तणाव निवळणार?, ज्यो बायडेन-शी जिनपिंग जी- २० शिखर परिषदेपूर्वी भेटले | पुढारी

G20 summit | अमेरिका-चीनमधील तणाव निवळणार?, ज्यो बायडेन-शी जिनपिंग जी- २० शिखर परिषदेपूर्वी भेटले

बाली (इंडोनेशिया) : G20 summit- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची इंडोनेशियातील बाली येथे G20 शिखर परिषदेपूर्वी भेट झाली. बायडेन आणि शी जिनपिंग यांनी सोमवारी बाली येथील हॉटेलमधील भेटीदरम्यान एकमेकांना हस्तांदोलन केले. बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिली वैयक्तिक भेट आहे. G20 शिखर परिषदेच्या दरम्यान उभय नेत्यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर बायडेन पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते. “तुम्हाला भेटून आनंद झाला,” असे बैठकीच्या खोलीमध्ये जाण्यापूर्वी बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी उभय नेत्यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली याचा तपशील उघड केलेला नाही. “आमच्यामध्ये काही गैरसमज आहेत,” असे बायडेन यांनी रविवारी कंबोडियामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.

गेल्या काही दिवसांत चीन आणि तैवान यांच्यामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. या वादात अमेरिकेने उडी घेतल्याने कधीही युद्ध भडकू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर प्रथमच चीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष समोरासमोर भेटले आहेत. यामुळे तैवानवरुन निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपली हत्या होण्याच्या भीतीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ’जी-२०’ परिषदेत सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनवर हल्ला केल्याने पाश्चिमात्य देशाकडून धोका असल्याने पुतीन नाराज आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनच्या विशेष फोर्सकडून पुतीन यांना ठार मारले जाण्याची भीती असल्याने ते ’जी-२०’ परिषदेत सहभागी होणार नसल्याचे पुतीन सल्लागार पदी राहिलेले सर्गेई मार्कोव्ह यांनी सांगितले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या इंडोनेशिया दौर्‍यावर रवाना झाले आहेत. तेथे ते ‘जी- २०’ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक नेत्यांसोबत त्यांच्या बैठका होणार असून पुढील वर्षासाठी ‘जी- २०’चे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. (G20 summit)

हे ही वाचा :

Back to top button