
पुढारी ऑनलाईन : नव्वदी पार केलेल्या लता मंगेशकर यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. चाळीसच्या दशकापासून ज्यांचा आवाज संगीत क्षेत्रात आहे, अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज २८ सप्टेंबरला ९२ वा वाढदिवस आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणे लता मंगेशकर यांच्या वडिलांनी त्यांचे भविष्य वर्तवले होते.
मुलगी गळ्यात गंधार घेऊन जन्मली आहे. ही फार मोठी होईल. नाव मिळवेल, असे उद्गार लता यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांनी काढले होते. ते स्वत: अभिजात गायक होते.
परवशता पाश दैवी हे त्यांचे नाट्यगीत अमर कीर्तीचे आहे. त्यांची स्वत:ची बलवंत कंपनी होती. तसेच चित्रपट संस्थाही त्यांनी स्थापन केली. परंतु, १९३२ च्या बोलपटांच्या गर्दीत त्यांची सिनेमा कंपनी अयशस्वी ठरली. पण, मंगेशकर कुटुंबीयांमधील लता, आशा, उषा या बहिंणींनी आपला आवाज जगात घुमवून अजरामर केला.
लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही भावंडे. १९४१ मध्ये सांगलीत दीनानाथ यांचं निधन झालं. त्यानंतर मंगेशकर कुटुंब कोल्हापुरात आले.
कोल्हापुरातील खरी कॉर्नरला बाबूराव पेंटर यांच्या घराजवळ मंगेशकर कुटुंब राहायचे. लतादिदी काही दिवस भवानी मंडपाजवळील जुन्या वाड्यातील एमएलजी हायस्कूलमध्ये शिकत होत्या. त्यांची अंगकाठी सडपातळ होती. त्या कबड्डी आणि खो-खो चांगल्या खेळायच्या, असा संदर्भ बाबुराव धारवाडे यांच्या जुनं कोल्हापूर या पुस्तकात सापडतो.
त्यावेळी कोल्हापुरात मास्टर विनायक यांची हंस पिक्चर्स कंपनी चांगली चालली होती.मास्टर विनायक यांनी लताजींना या कंपनीसाठी काम करायची ऑफर दिली.
त्या मॉबमध्ये, मुलींच्या मेळ्यात, नृत्यात आणि गायनाच्या स्पर्धेतही भाग घ्यायच्या.
१९४१ रोजी पंजाबी चित्रपट खजांची गाणी प्रसिध्द होती. गायिका नूरजहाँने ती गायली होती. त्या चित्रपटांच्या गाण्यांची एक स्पर्धा राजाराम टॉकीजमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यातील 'लौट गई पापन अंधी' हे गाणे लोकप्रिय होते. ते लताजींनी खूप सुंदर गायले. या गाण्यासाठी त्यांना त्यावेळी २५ रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले होते.
शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी "खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला.
यातल्या "सावन के नजारे हैं अहा अहा' या गाणं हिट ठरलं होतं.
त्यावेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत बारा वर्षांच्या लतानं भाग घेऊन 'खजांची'मधील गाणं गाऊन पहिला क्रमांक मिळवला होता.
लता मंगेशकर या ताऱ्याचा उदय होण्यापूर्वी ज्या गायिकांची आपली संगीत कारकीर्द फुलवली होती, त्यापैकी एक शमशाद बेगम होत्या.
दरम्यानच्या काळात विनायकरावांनी पुण्यास स्थलांतर केले. तेथे त्यांनी आचार्य अत्रे, राजगुरू आदींच्या सहकार्याने युग फिल्म कंपनी प्रा. लि. ही संस्था काढली.
दामुअण्णा मालवणकर, मीनाक्षी, विष्णूपंत जोग, सहाय्यक दिग्दर्शक दिनकर द. पाटील, माधव शिंदे, वसंत शेळके यांच्यासोबत लतादिदींनाही त्यांनी पुण्यात नेले. तेथे 'सरकारी पाहुणे,' 'पहिली मंगळागौर' हे चित्रपट काढले. त्यात लता यांनी 'आम्ही वळिखले गं' हे गाणे परकर पोलक्यात नाचत बागडत गायले होते.
विनायकराव परत कोल्हापुरात आले. येथे त्यांनी शालिनी स्टुडिओत प्रफुल्ल पिक्चर्स संस्था काढली. त्यामुळे लताजी पुन्हा कोल्हापुरात आल्या.
संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर यांनी लताजींना पार्श्वगायनाची संधी दिली. विनायकरावांनी पुन्हा मुंबईस प्रफुल्लचे स्थलांतर केले.
विनायकरावांनी येथे मोठे चित्रपट काढले. त्यांनी आपल्या चित्रपटात गोड गळ्याची अभिनेत्री नूरजहाँ यांना काम दिले.
नूरजहाँ आणि लता यांचा परिचय चित्रपटातूनच झाला. पार्श्वगायिका म्हणून लताजींना मुंबईत प्रसिध्दी मिळाली होती.
राजकपूर यांच्या 'बरसात'मधील 'हवा में उडता जाये,' 'आवारा'मधी ल 'घर आया मेरा परदेशी' या गाण्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
मेहबूब यांच्या 'अंदाज' चित्रपटात संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी लताबाईंच्या आवाजाचे सोने करून घेतले होते.
तसेच संगीत दिग्दर्शक खेमचंद्र प्रकाश यांनी 'महल'मधील 'आयेगा, आयेगा आनेवाला' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
नंतर सी. रामचंद्र यांच्याबरोबर काम केले. 'अनारकली' चित्रपटातील 'ए जिंदगी उसी की है'ने सिनेरसिकांना मोहून टाकलं.
लता यांच्या या सर्व यशाने कोल्हापुरकरांना अभिमान वाटला. कोल्हापुरकरांनी लताजींना अक्षरश: डोक्यावर घेतले.
भालजी पेंढारकर यांनी मदनमोहन लोहियांच्या हस्ते लताजींचा सत्कार करायचे ठरवले.
लता मंगेशकर यांच्या पार्श्वगायनाचा रौप्यमहोत्सव कलानगरीत करण्याचे ठरले.
१९६७ चे हे वर्ष. शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानात संध्याकाळी सत्कार सोहळा झाला. गर्दीने मैदान तुडूंब भरले होते.
भाई एम. के. जाधव नगराध्यक्ष होते. दिनकरराव यादव जिल्हा परिषद अध्यक्ष, विख्यात कादंबरीकार आणि मा. विनायकांच्या कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य वि. स. उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या हस्ते सत्कार झाला.
नगराध्यक्षांनी भाषण केले. ते म्हणाले, 'लताचा गळा म्हणजे ईश्वरी लेणे आहे. ते क्वचितच कुणाला तरी लाभते. ते त्यांना त्यांच्या पित्यांच्या वारशाने आणि पुण्याईने लाभले आहे.
लतादीदींच्या आवाजाने सारं कोल्हापूर 'लता'मय झाले.
संदर्भ: जुनं कोल्हापूर, बाबुराव धारवाडे