पुढारी ऑनलाईन : कवी कुमार विश्वास यांच्या घरी बुधवारी (दि.20) सकाळी अचानक पंजाब पोलीस पोहचले. यानंतर त्यांनी काही छायाचित्रांसोबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा दिला आहे. कुमार विश्वास यांनी ट्विटमध्ये केलेल्या फाेटाेमध्ये त्यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे दिसत आहेत.
कुमार विश्वास यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, " पहाटे पंजाब पोलिस दारात येतात. @भगवंत मान मी तुम्हाला इशारा देतो की, दिल्लीत बसलेली व्यक्ती, ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, ती एक दिवस तुमची आणि पंजाबचीही फसवणूक करेल. हा माझा इशारा देशाला एक दिवस आठवेल."
पंजाब पोलीस कोणत्या कारणास्तव कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले होते, हे कळू शकलेले नाही. पण, पंजाब निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कुमार विश्वास खूप चर्चेत आले होते. मात्र, केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
केजरीवाल यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, "कदाचित मी जगातील सर्वात गोड दहशतवादी असेन, जो शाळा आणि रुग्णालये बांधतो. पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय पाहून भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष आमच्याविरूद्ध एकवटले आहेत".