पुढारी ऑनलाईन डेस्क : Kuldeep Yadav ICC Rankings : आशिया कपच्या सुपर 4 फेरीत सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय संघ 15 सप्टेंबरला बांगलादेशशी भिडणार असून त्यानंतर अंतिम सामना होणार आहे. मात्र, अंतिम फेरीत टीम इंडियाशी टक्कर देणारा दुसरा संघ कोण असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, भारतीय संघाला दोन सामन्यांमध्ये मिळालेल्या विजयात कुलदीप यादवने सर्वात मोठे योगदान दिले. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पाच आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चार विकेट घेत शानदार कामगिरी केली आहे. यामुळे त्याला आयसीसी वनडे क्रमवारीतही मोठा फायदा झाला आहे.
आयसीसीने नवीन एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये कुलदीप यादवने पहिल्या 10 मध्ये एन्ट्री घेतली आहे. अवघ्या दोन सामन्यांतच त्याने चित्र पालटले आहे. आशिया कपच्या सुपर 4 फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने आठ षटकांत 25 धावा देत पाच बळी घेतले.
यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवले. खरेतर हा लो स्कोअरिंग सामना होता आणि एका क्षणी श्रीलंका सामना जिंकेल असे वाटत होते. पण कुलदीप भारतीय संघासाठी संकटमोचक ठरला. त्याने 9.3 षटकांत 43 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना तंबूत धाडले. पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट घेतल्यानंतर तो आठव्या क्रमांकावर आला होता, तर श्रीलंकेविरुद्ध चार विकेट घेतल्यानंतर तो सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याचे रेटिंग सध्या 656 आहे. अव्वलस्थानी असलेल्या जोश हेझलवूडचे रेटिंग 692 आहे. उर्वरित आशिया कप आणि अगामी विश्वचषकातही तो चमत्कार करताना दिसेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.