कोल्‍हापूर : बिद्रीच्या चिमणीसाठी झडू लागल्या आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी, लुगड्याची जोरदार चर्चा

कोल्‍हापूर : बिद्रीच्या चिमणीसाठी झडू लागल्या आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी, लुगड्याची जोरदार चर्चा
Published on
Updated on

मुदाळतिट्टा (जि. कोल्हापूर); श्याम पाटील : भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यांतील 218 गावांचे कार्यक्षेत्र व जवळपास 68 हजारांवर सभासद असणाऱ्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला आतापासून सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या लुगड्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे बिद्रीच्या चिमणीला डोळ्यासमोर ठेवून केलेली ही विधाने म्हणजे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम सुरू असल्याची चर्चा आहे.

बिद्री साखर कारखाना वाचावा आणि प्रशासनात चांगली माणसे निवडून यावीत म्हणून गावोगावी फिरुन मतदान मागितले. परंतू सत्ता मिळाल्यानंतर सतारुढ गटाने आपल्याला एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. जरी दिले असते, तरीही मी गेलो नसतो. काही महिन्यानंतर बिद्रीची निवडणूक असून एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही, असे बिद्री येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना काही दिवसापूर्वी इशारा दिला होता.

सहकारात राजकारण नसावे या भावनेने 'बिद्री' मध्ये राष्ट्रवादीने भाजपशी युती केली. परंतू निवडणुकीनंतर स्वीकृत संचालकपदाच्या एका जागेसाठी चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सांगून विस्तारीकरण अडवले. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही असे दादा म्हणत असतील तर, आम्हीही आजवर अनेक लुगडी बदलली आहेत, असे उत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोरवडे येथे दिले आहे.

तसेच, बिद्री साखर कारखान्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. पण नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र व शिवसेना स्वंतत्र लढली होती. बिद्रीच्या आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत राहणार हा एक न सुटणारा प्रश्न निर्माण झाला आहे. हिम्मत असेल तर चंद्रकांत पाटील यांनी आखाड्यात यावे असे खुले आव्हान आमदार प्रकाश आबीटकर यांनी गारगोटी येथील सभेत केले होते. यामुळे बिद्रीच्या चिमणीसाठी भाजप शिवसेना एकत्र येतील की स्वतंत्र लढतीत हा प्रश्न आहे.

आमदार आबिटकर यांचे राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी जवळीक पाहता या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येणार का हे पहावे लागेल. भुदरगड तालुक्यामध्ये एकसंघ झालेली व कोणत्याही पदावर नसलेली सतेज पाटील यांची सतेज काँग्रेस टीम या निवडणुकीत का करणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. कागलमध्ये तिन्ही पक्ष तिरंगी लढतीसाठी सामोरे जातील की समझोता एक्सप्रेस ला कवटाळत मिठ्या मारतील या प्रश्नाचे उत्तर आताच सुटणारे नाही.

राज्यातील महाआघाडी सारखी महाआघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने उभी राहणार की महाआघाडीत फूट पडणार हे बिद्रीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आपली कोणती भूमिका घेणार कुणाला पाठिंबा देणार, सोबत घेणार हे येणारा काळच ठरवणार आहे .त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेली ही निवडणूक बिद्रीच्या कार्यस्थळावर एक चर्चेचा विषय बनली आहे.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news