Kolhapur News : महामार्गावर भरावाऐवजी पिलर टाकूनच पूल; मंत्री गडकरींची ग्वाही; डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

Kolhapur News : महामार्गावर भरावाऐवजी पिलर टाकूनच पूल; मंत्री गडकरींची ग्वाही; डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली ते पंचगंगा पुलापर्यंतच्या रस्त्याची उंची भराव टाकून वाढवण्याऐवजी ती पिलर टाकून (व्हाया डक्ट पद्धतीने) वाढवली जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना बुधवारी दिली. (Kolhapur News)

याबाबत डॉ. जाधव यांनी पाठविलेले पत्र मंत्री गडकरी यांना बुधवारी मिळाले. यानंतर डॉ. जाधव आणि मंत्री गडकरी यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मंत्री गडकरी यांनी आपल्या सूचनेनुसार योग्य तो बदल करण्यात येईल. तसेच आरई वॉलचे काम मार्गी लावणार, असेही स्पष्ट केले. (Kolhapur News)

महापुरात महामार्ग खंडित होऊ नये, याकरिता सहापदरीकरण करताना शिरोली ते पंचगंगा पूल आणि पंचगंगा पूल ते उचगाव रेल्वे उड्डाणपूल या मार्गाची भराव टाकून उंची वाढवण्यात येणार होती. कोल्हापुरातील महापुराला महामार्गाचा सध्याचाच भराव कारणीभूत ठरत आहे, त्यात त्याची उंची आणखी वाढली, तर महामार्गावर एकप्रकारे धरण तयार होईल, त्यामुळे कोल्हापूरसाठी ते दरवर्षी मरणच ठरेल, अशी परिस्थिती दरवर्षी निर्माण होईल. यामुळे कोल्हापूरला अतोनात नुकसानीचा कायमस्वरूपी आणि गंभीर धोका होता.

याबाबत दै. 'पुढारी'तून 'महामार्गावर धरण, कोल्हापूरचे मरण' अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. महामार्गाच्या भराव टाकून उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी मंत्री गडकरी यांना पत्र पाठवले होते.

कोल्हापूरमध्ये 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरासाठी पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पुलाच्या पोहोच रस्त्याचा पूर नियंत्रण व निषिद्ध क्षेत्रात असलेला भराव कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा डॉ. जाधव यांनी या पत्रात मांडला होता. कोल्हापूर व सांगली येथील पुराची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने अशाप्रकारच्या बांधकामांचे हायड्रॉलिक ऑडिट करावे, अशी शिफारस केल्याचा संदर्भदेखील या पत्रात दिला होता.

कोल्हापूर शहर आणि परिसरात या दोन्ही महापुरांमुळे अतोनात नुकसान झाले असून, सध्याचा शिरोली ते पंचगंगा पूल या मार्गावरील भरावच पाणी साचून राहण्याचे प्रमुख कारण आहे. असे असताना हा भराव आणखी वाढणार असेल, तर कोल्हापुरात दरवर्षी पुराचे पाणी साचून राहण्याची आणि पर्यायाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा या पत्रात दिला आहे. तसेच हे नुकसान टाळ्यासाठी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणांतर्गत कागल-सातारा पॅकेज-1 मधील पंचगंगा नदीवरील शिरोली, कोल्हापूर, (चेनेज 616.375 कि.मी.) येथे बांधण्यात येणार्‍या सर्व पुलांचे पोहोच रस्ते भराव टाकून न बांधता व्हाया डक्ट पद्धतीने (पिलर उभे करून) बांधावेत, अशी मागणी करत महामार्गावरील पंचगंगा पूल परिसरातील सध्याच्या रचनेमुळे कोल्हापूरकरांना होणार्‍या संभाव्य त्रासाकडेही डॉ. जाधव यांनी या पत्रात मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले होते. डॉ. जाधव यांनी पाठवलेेले हे पत्र बुधवारी मंत्री गडकरी यांना मिळाले. यानंतर गडकरी यांनी डॉ. जाधव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.

कोल्हापूरमध्ये पुराची समस्या उद्भवू नये, यासाठी कारणीभूत ठरणार्‍या पंचगंगा नदीवरील पुलांचे पोहोच रस्ते भराव पद्धतीने न बांधता डक्ट पद्धतीने (पिलर उभे करून) बांधावेत, याबाबत दै. 'पुढारी'चेे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी सुचविलेल्या प्रस्तावानुसार, पुलांच्या रचनेमध्ये योग्य तो बदल करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news