सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत | पुढारी

सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमधून प्रवास करताना एका महिलेची किंमती ऐवज असलेली पिशवी बसमध्येच राहिली होती. पाच लाख ऐवजाची ही पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात परत मिळाली. सोलापूर एसटी बसस्थानकात पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले.

ललिताबाई गोविंदराव भोसले (वय ३०, रा. खानापूर, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक) या उमरगा येथून नळदुर्गला एसटी बसने निघाल्या होत्या. नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी नकळत एसटी बसमध्येच राहिली. हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला. पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती. तसेच त्यांचा मोबाईलही पिशवीतच होता. सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली. पिशवी उघडून पाहिली असता मोबाईलसह सोने-चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. वाहक आणि चालकाने ही किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली.

पिशवीतील मोबाईलच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबीयांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सोलापूर एसटी बसस्थानक गाठले आणि आगारप्रमुख बनसोडे यांची भेट घेतली. योग्य खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किंमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली. यावेळी बसवाहक महेश माने व चालक मिलिंद चंदनशिवे यांच्या प्रामाणिकपणाचे भोसले कुटुंबीयांनी कौतुक करीत बक्षीस देऊ केले. परंतु दोघांनी नम्रपणे नकार दिला. एसटी वाहक महेश माने (वय ३०) हे मूळ शेटफळ (ता. मोहोळ) येथील राहणारे असून गेल्याच वर्षी त्यांची एसटी वाहकपदावर नियुक्ती झाली होती.

हेही वाचा : 

Back to top button