Manoj jarange : अन्यथा सरकारला जागा दाखवून देणार : मनोज जरांगे पाटील

Manoj jarange : अन्यथा सरकारला जागा दाखवून देणार : मनोज जरांगे पाटील

राहुरी/राहाता : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाला मराठा आरक्षणाबाबत 40 दिवसांची दिलेली मुदत संपत आली आहे. योग्य निर्णय घ्या, अन्यथा अंतरावली येथे राज्यव्यापी बैठक घेऊन मराठा समाज शासनाला जागा दाखवून देणार आहे. गेली 75 वर्ष मराठा समाजाने इतर समाजातील नेत्यांना मान सन्मान देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच नेत्यांनी मराठा आरक्षण विरोधात भूमिका घेत आपला खरा चेहरा समोर आणल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी राहुरीत सांगितले. राहुरी येथील विठ्ठला लॉन्स येथे आयोजित मराठा एकिकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

सकाळी जरांगे पाटील यांचे राहुरी येथे बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळ आ. प्राजक्त तनपुरे यांनी स्वागत केले. बैठकीप्रसंगी जरांगे पाटील म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतू आज पर्यंत मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रात संख्येने जास्त असलेला मराठा समाज सर्वांच्या मदतीला धावून जातो. मराठा गरीब, मागास व शेतकरी असून समाजाला आरक्षण नाही. गेल्या 75 वर्षांपासून आमच्या पुर्वजांनी सर्वच पक्षातील इतर जातींच्या नेत्यांची मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्यावर वेळ आली होती तेव्हा कोणताही जातीचा भेदभाव न करता त्यांचा राजकिय प्रवास वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला.

आज आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना हे मात्र आता आरक्षणाला विरोध करीत आहे. मराठा समाजाने तुम्हाला कधीच परके मानले नाही. परंतू तुम्ही मराठा समाजाला कधीच आपले मानत नव्हते हे आता उघड झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागात मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळत आहे. मात्र इतर भागात नोंदी नसल्याने कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यासाठी राज्यातील सर्वच मराठा बांधवाना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी हा लढा सुरू आहे.

भारत देशात मराठा ही एकमेव जात मागास म्हणून सिध्द झाली आहे. इतर कोणतीही जात मागास म्हणून सिध्द झालेली नसताना त्यांना आरक्षण दिले आहे. ओबीसी जातीची जणगनणा केल्यास अनेक जाती मागास सिध्द होणार नाही. मंडल आयोगाने कोणतीही जनगणना न करता ओबीसी आरक्षण दिले. आंतरवली येथे लोकशाहीच्या मार्गाने आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना निष्पाप समाजाच्या माता भगिनीवर सरकारने लाठीहल्ला केला. हा हल्ला आंतरवलीच्या ग्रामस्थांवर नव्हता तो अखंड मराठा समाजावर केलेला हल्ला होता.
सरकारने आरक्षणासाठी जी समिती गठीत केली.

त्या समितीला हैदराबादला जवळपास 5 हजार पुरावे सापडले आहे. सरकारने आपल्याकडून 30 दिवसांची मुदत मागीतली होती. आपण त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. 30 दिवसांची मुदत येत्या 14 ऑक्टोबरला संपत आली असून त्यादिवशी आंतरवली येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिशा ठरविण्यासाठी जाहिर सभा होणार असून या सभेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठा एकिकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे यांनी तर आभार संभाजीराजे प्रतिष्ठाणचे राजूभाऊ शेटे यांनी मानले.

जेसीबीतून फुलांची उधळण
राहुरीत सर्वपक्षिय मराठा समाजाच्या तरूणांनी एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. तरूणांनी जेसीबी आणत जरांगे यांच्यावर फुलांची उधळण केली. याप्रसंगी मराठा समाजाकडून 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आरक्षण मागणीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी मोठी एकी दाखविली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news