Maratha reservation agitation | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

Maratha reservation agitation | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाच्या पाश्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा आज गुरुवारी (दि.२) बंद ठेवण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलने सुरु आहेत. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Maratha reservation agitation)

संबंधित बातम्या 

मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ४८ तासांसाठी ही सेवा बंद असेल. १ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपासून ३ नोव्हेंबरपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली आहे, असे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इंटरनेट बंद केल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. गृहविभागाच्या या अघारी निर्णयामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात उपोषण सुरु असून आरक्षणाची मागणी तीव्र बनली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल २१ ठिकाणी उपोषण सुरु आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हे आंदोलन अचानक पेटले. बीड जिल्ह्यात माजलगाव, धारून, बीड शहरात जाळपोळ करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातही टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी शांततेत आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करावे. पोलिसांना सहकार्य करून प्रत्येक गोष्टीची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केले.

तोडफोड, जाळपोळ करणाऱ्यांवर गुन्हे

ग्रामीण भागात आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी गंगापूरमध्ये आ. प्रशांत बंब यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय जागोजागी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. यामुळे अनेक ठिकाणी सामान्यांची कोडी झाली. रुग्णवाहिका रोखल्या गेल्या. त्यामुळे जे आंदोलक अतिशय उद्रेक करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत. यांत ५९ आरोपी निष्पन्न झाले आहेत, कोणालाही अटक केलेली नाही, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.

इंटरनेट सेवा बंद करून आरक्षण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, क्रांती मोर्चाचा आरोप

जालना, बीडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा बंद करून, राज्य सरकार मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी बुधवारी (दि. १) क्रांतीचौक येथे आयोजित पत्रपरिषदेत केला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना शासनाने हात लावण्याचा प्रयत्न जरी केला, तर राज्यातील जनता पेटून उठेल आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा देतानाच इंटरनेट सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल इंटरनेट सेवा मंगळवारी दुपारनंतर अचानक बंद करण्यात आली. त्यामुळे सरकार जरांगे यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे की काय, अशी अफवा मंगळवारी रात्री पसरली होती. आता बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण भागाचेदेखील नेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने क्रांतीचौक येथे आंदोलन करणारे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय काकडे यांनी राज्य सरकारने इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी अशोक वाघ, रमेश आण्णा, अरुण नवले, योगेश केवारे, परमेश्वर नलावडे, गणेश वीर, दशरथ गमे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news