Maratha Reservation : उपोषणकर्त्यांनी नाकारली वैद्यकीय सेवा | पुढारी

Maratha Reservation : उपोषणकर्त्यांनी नाकारली वैद्यकीय सेवा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले, त्यांना पाठिंबा देण्यासाठी नगरमध्ये चार तरुणांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांनी आज वैद्यकीय सेवा नाकारली. नगरमध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मार्चातर्फे गेल्या सात दिवसांपासून नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, मराठा कार्यकर्ते गोरख दळवी, अमोल हुंबे, नवनाथ काळे, संतोष आजबे यांनी सोमवारपासून आंदोलनस्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. कालपासून आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना, पदाधिकार्‍यांंनी भेट दिली. नगरसेवकांनी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. आज सकाळी शासकीय वैद्यकीय पथक आंदोलनकर्त्यांची तपासणी करण्यासाठी आले असता उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपाचार नाकारले.

संबंधित बातम्या :

उपोषणकर्त्यांनी सांगितले, की संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास काही झाल्यास राज्यकर्त्यांना महाराष्ट्र सोडून जावे लागेल. राजीनामा देऊन उपयोग नाही. मराठा समाजाने मतदान करून त्यांना विधानसभेत पाठविले आहे. समाजाच्या 147 आमदारांनी थेट राज्यापालांकडे जाऊन विशेष अधिवेशनाची मागणी करावी आणि कायदा पारित करावा, हाच एकमेव पर्याय आहे. आमच्या जीवितास काही झाल्यास सर्व जबाबदारी सरकारची राहील.

नगर बार असोसिएशनचा पाठिंबा
मराठा समाजास आरक्षणास पाठिंबा असल्याचा ठराव अहमदनगर शहर बार असोसिएशने जाहीर केला. मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश लगड यांच्या अध्यक्षतेखाली बार असोसिएशनच्या सभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पाटील यांनी दिली. वकील संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, सचिव अ‍ॅड. गौरव दांगट, सहसचिव अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. रामेश्वर कराळे, अ‍ॅड. नितीन खैरे, लॉयर्स सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, सहायक सरकारी वकील अनिल सरोदे, अ‍ॅड. महेश काळे, अ‍ॅड. सतीश गुगळे, अ‍ॅड. रफीक बेग, अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, अ‍ॅड. पी. डी. शहाणे, अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. सचिन बढे, अ‍ॅड. शेखर दरंदले आदी उपस्थित होते.

तरुणांनी दुकाने केली बंद
राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन, रास्ता रोको सुरू असताना नगरमध्ये मंगळवारी दुपारी तपोवन रस्त्याकडून आलेल्या दहा ते पंधरा दुचाकींवरील वीस ते पंचवीस तरुणांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले.

Back to top button