India vs Iran kabaddi Asian Games 2023 | चीनमध्ये घुमला भारताचा शड्डू! कबड्डीत इराणला हरवत पुरुष संघाची सुवर्ण कामगिरी

India vs Iran kabaddi Asian Games 2023 | चीनमध्ये घुमला भारताचा शड्डू! कबड्डीत इराणला हरवत पुरुष संघाची सुवर्ण कामगिरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारताच्या महिलांनी कबड्डीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघानेही आज शनिवारी (दि.७) सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीतील अटीतटीच्या लढतीत भारताने इराणचा ३३-२९ अशा गुणांनी पराभव केला. अखेरच्या मिनिटातील गुणावरुन वाद झाल्याने हा सामना तासभर लांबला. पण अखेर भारताने बाजी मारत सुवर्ण कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे २८ वे सुवर्णपदक आहे. भारताने आतापर्यंत २८ सुवर्ण, ३५ रौप्य, ४० कांस्य मिळून एकूण १०३ पदकांची कमाई केली आहे.

सुरुवातीला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक चढाई केली. पूर्वार्धात १० मिनिटे शिल्लक असताना इराणने ३ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने गुण घेतल्याने दोन्ही संघ ५-५ असे बरोबरीत राहिले. त्यानंतर इराणने ९-६ अशी आघाडी घेतली. पण भारताने कमबॅक करत पहिल्या हाफच्या शेवटच्या ४ मिनिटांमध्ये बाजी पलटवली. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम बचावाचे प्रदर्शन करत ४ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. पहिला हाफ संपला तेव्हा भारत १७-१३ अशा गुणांनी आघाडीवर होता. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला इराण संघ ऑल आउट झाला होता. (India vs Iran kabaddi 2023 scorecard final match)

संबंधित बातम्या 

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीच्या १० मिनिटांत भारताने खेळावर वर्चस्व कायम ठेवले. १३ मिनिटे शिल्लक असताना भारताच्या नवीनला बोनस गुण मिळाला. त्यानंतर दुसऱ्या हाफची ९ मिनिटे शिल्लक असताना इराणने आक्रमक चढाई आणि मजबूत पकडीच्या जोरावर २५-२५ अशी बरोबरी साधली. पण नवीनने १ गुण घेत आघाडी मिळवून दिली. ६ मिनिटे शिल्लक असताना भारताने २८-२५ अशी आघाडी घेतली होती. (India vs Iran kabaddi match result)

कबड्डीत इराणचा रडीचा डाव, पण अखेर भारताची बाजी

अटतटीच्या लढतीत अखेरच्या ३ मिनिटांत गणसंख्या २८-२८ अशी बरोबरी झाली होती. शेवटच्या मिनिटांत नवीनला मैदानाबाहेर ढकलले. पण नवीन नियमानुसार चढाईसाठी गेलेल्या नवीनला मैदानाबाहेर ढकलल्याने भारताला गुण मिळणे अपेक्षित होते. पण पंचांनी इराणला गुण दिल्याने भारतीय खेळाडूंनी त्यावर आक्षेप घेत मॅटवर ठिय्या मारला. त्यानंतर पंचांनी भारताला ३ आणि इराणला १ गुण बहाल केला. त्यावर इराणने आक्षेप घेत मॅटवर ठिय्या मारला. यामुळे खेळ बराच वेळ निलंबित राहिला. पंचांनी दिलेल्या गुणावरुन बराच वेळ वाद सुरु राहिला. सुमारे तासभर हा ड्राम सुरु होता. यामुळे कबड्डीच्या इतिहासातील हा सर्वात लांबलेला सामना ठरला.

त्यानंतर भारताला ३ आणि इराणला १ गुणावर पंचांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर सामना सुरु झाला. अखेरच्या मिनिटात भारताने ३१-२९ अशी आघाडी घेतली होती. शेवटच्या मिनिटात भारताने आणखी गुण घेत ३३-२९ अशी विजयी आघाडी मिळवली आणि सामना आपल्या खिशात घातला.

काल शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तानला ६१-१४ अशा गुणांनी पराभूत केले होते.

इराणने त्यांचा स्टार बचावपटू फझेल अत्राचली आणि अष्टपैलू मोहम्मद इस्माईल नबीबख्श आणि मोहम्मद रेझा शाद्लू यांचा समावेश असलेल्या संघाने उपांत्य फेरीत चायनीज तैपेईविरुद्ध मात केली होती. ते पाकिस्तान, मलेशिया आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यावर विजय मिळवून गटात अपराजित राहिले होते. पण भारताने इराणची अपराजित राहण्याची मालिका अंतिम फेरीत खंडित केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताचे नेहमीच कबड्डीत वर्चस्व राहिले आहे. बीजिंग १९९० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय पुरुष संघाने सलग सात सुवर्णपदके जिंकली होती. पण जकार्ता २०१८ मध्ये इराणने भारताची सुवर्ण कामगिरी थांबवली होती. तर २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा इराणकडून २७-१८ असा पराभव झाला होता.

दरम्यान, भारतीय महिला संघाने आज सकाळी झालेल्या अंतिम फेरीतील सामन्यात चायनीज तैपेईचा पराभव करुन देशाला १०० वे पदक मिळवून दिले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news