देशातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ९६ हजारांवर

देशातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या ९६ हजारांवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११,७९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ९,४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९६,७०० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रविवारी दिवसभरात १७ हजार ७३ हजार कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १५ हजार २०८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५७ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५.६२ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.३९ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ३१ लाख ४३ हजार १९६ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.६३ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ४१ लाख ५३ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने पुरवलेल्या एकूण १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी ११ कोटी ९९ लाख ६६ हजार १३० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात सोमवारपर्यंत ८६ कोटी १४ लाख कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ७३ हजार ७१७ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या १२,४७९ वर

मुंबईत एका दिवसात १,०६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,३०५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोनामुक्ती दर ९७ टक्के एवढा आहे. सध्या येथे १२,४७९ सक्रिय रुग्ण आहेत.

औरंगाबादेत दुसर्‍या दिवशीही कोरोनाबळीची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यातील वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली असतानाच सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या मृत्युमुळे तर यंत्रणेची झोपच उडाली आहे. सोमवारी (दि.२७) शहरातील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी शहरातीलच एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यात नव्याने आढळणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने शंभरी पार केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी विविध भागांतून ९ रुग्णांची नव्याने भर पडली. ग्रामीणमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर चिकलठाणा येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news