औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली असतानाच सलग दुसर्या दिवशी झालेल्या मृत्युमुळे तर यंत्रणेची झोपच उडाली आहे. सोमवारी (दि.27) शहरातील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी शहरातीलच एका 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात नव्याने आढळणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने शंभरी पार केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी विविध भागांतून 9 रुग्णांची नव्याने भर पडली. ग्रामीणमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर चिकलठाणा येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी तब्बल 117 दिवसांनंतर कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. सलग दुसर्या दिवशी सोमवारी रुग्ण दगावल्याने आरोग्य विभाग हादरला असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहर हद्दीतील 16 जणांना उपचारांती बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात 104 सक्रिय रुग्ण असून, यातील 22 जण विविध रुग्णालयांत तर, 84 जण घरीच उपचार घेत आहेत.