पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघांमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सामने पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून सुरू होणारा या मालिकेतील अंतिम सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही मालिका चार सामन्यांची असायची, मात्र यावेळी दोन्ही संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. १९९१-९२ नंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर वर्षाच्या अखेरीस भारतीय संघासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
भारतीय संघाच्या या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान संघ सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे, तर दोन्ही संघांमध्ये एकच कसोटी खेळली जाणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एमसीजी, ॲडलेड ओव्हल आणि पर्थ स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील आणि त्यापूर्वी दोन्ही संघ टी-२० मालिका खेळतील. ही मालिका १८ नोव्हेंबरला संपणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
पहिली कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर (पर्थ)
दुसरी कसोटी : ६ ते १० डिसेंबर (ॲडलेड)
तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर (ब्रिस्बेन)
चौथी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
पाचवी कसोटी : ३ ते ७ जानेवारी (सिडनी)
हेही वाचा :