IPL Full Schedule Updates : आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार फायनल | पुढारी

IPL Full Schedule Updates : आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार फायनल

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Full Schedule : आयपीएल 2024 च्या पूर्ण वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी 17 व्या हंगामाचे उर्वरित वेळापत्रक जाहीर केले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर-2 (24 मे) आणि अंतिम सामना (26 मे) खेळवला जाणार आहे. तर क्वालिफायर-1 (21 मे) आणि एलिमिनेटर (22 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरुवातीला 7 एप्रिलपर्यंत केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. नुकत्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक तयार करण्यात आले. ज्यामध्ये एकूण 66 दिवसांत एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 जूनला होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा टप्पा परदेशात आयोजित करण्याची चर्चा होती. मात्र, आता आयपीएलचे सर्व सामने भारतीय भूमीवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेन्नई तिसऱ्यांदा यजमानपदासाठी सज्ज

चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदाच्या सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी 2011 आणि 2012 मध्ये चेन्नईमध्ये विजेतेपदाचा सामना झाला होता. 2011 मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात सीएसके आरसीबीचा 58 धावांनी पराभव केला होता. तर 2012 मध्ये पार पडलेल्या फायनलध्ये केकेआरने सीएसकेवर 5 विकेटने रोमांचक विजय मिळवून आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते.

आयपीएलचा 17 हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला आहे. सलामीचा सामना चेन्नई येथे खेळला गेला, ज्यामध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा 6 गडी राखून पराभव केला.

सीएसके आणि आरसीबी लीग टप्प्यात पुन्हा एकदा भिडतील. 18 मे रोजी बेंगळुरूच्या एम स्टेडियमवर उभय संघांमध्ये लढत होणार आहे. CSK आणि मुंबई इंडियन्स (MI) फक्त एकदाच आमनेसामने येतील. 14 एप्रिल रोजी दोन्ही संघांचा सामना रंगणार आहे.

चालू हंगामात रविवारपर्यंत पाच सामने झाले आहेत. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांनी विजय मिळवला आहे. सोमवारी सहावा सामना आरसीबी आणि पंजाब यांच्यात होणार आहे.

Back to top button