पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील सहावा सामना आज (दि.२५) एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर ४ विकेटस्नी धमाकेदार विजय मिळवला.
सलामीवीर विराट कोहलीच्या ४९ चेंडूंतील ७७ धावांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर यजमान आरसीबीने येथील आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्जचा ४ गडी राखून धुव्वा उडवला. या लढतीत पंजाबने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली, तर प्रत्युत्तरात आरसीबीने १९.२ षटकांतच ६ गड्यांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.
शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर स्कूपचा षटकार खेचत लक्ष्य आवाक्यात आणले. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर ५ चेंडूत ३ धावा, असे समीकरण होते. यावेळी कार्तिकने लाँगऑनचा सणसणीत चौकार फटकावत थाटात विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
विजयासाठी १७७ धावांचे तुलनेने कडवे आव्हान असताना विराट कोहलीने ७७ धावांची आतषबाजी केली. मात्र, दुसर्या बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला सुरूच राहिल्याने आरसीबीचा संघ बॅकफूटवर फेकला जाईल, असे चित्र होते; पण याचवेळी कार्तिक व लोमरोर यांनी अवघ्या १८ चेंडूंत ४८ धावांचा झंझावात साकारत पंजाबच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. कार्तिक १० चेंडूंत २८ धावांवर, तर महिपाल लोमरोर ८ चेंडूंत १७ धावांवर नाबाद राहिले.
हेही वाचा :