IND vs AUS Test Series : बॉर्डर-गावसकर मालिकेबाबत मोठा निर्णय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची घोषणा | पुढारी

IND vs AUS Test Series : बॉर्डर-गावसकर मालिकेबाबत मोठा निर्णय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS Test Series : 2024 च्या अखेरीस खेळवल्या जाणा-या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये आता चारऐवजी पाच कसोटी सामने खेळवले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी एक्स पोस्टच्या माध्यमातून याची घोषणा केली. 1991-92 नंतर पहिल्यांदाच उभय देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिद्ध केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सोशल मीडियावरून माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, ‘बीसीसीआय नेहमीच कसोटी क्रिकेटचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. क्रिकेटच्या या दिर्घ फॉरमॅटबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळांनी पाच सामन्यांची मालिका आयोजित केली जावी यासाठी प्रयत्न केले, ज्यात यश आले. या कृतीतून कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्याची उभय मंडळांची सामूहिक वचनबद्धता दिसून येते.’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बायर्ड म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघांमधील तीव्र स्पर्धा पाहता, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पाच सामन्यांच्या मालिकेपर्यंत वाढवताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’

पर्थ कसोटीपासून मालिकेला सुरुवात होऊ शकते

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला यावर्षी नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता असून पहिल सामना पर्थ येथे खेळवला जाईल असा अंदाज आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी मायदेशात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचे विजेतेपद पटकावले होते. त्यापूर्वी 2020-21 मध्येही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन भूमीवर ट्रॉफी जिंकली होती. (IND vs AUS Test Series)

 

Back to top button