पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवू शकतो. आपण सूर्याची पूजा करतो, म्हणूनच आपल्याला भारत म्हटले जाते, ज्यामध्ये बहा म्हणजे प्रकाश. जगाला जागे करण्यासाठीच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले. बंगळुरूमध्ये समर्थ भारत संस्थेने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बाेलत हाेते.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, "देशाने तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जावे आणि जगाचे नेतृत्व करावे. मात्र, देशविरोधी शक्तींना आपण पुढे जावे असे वाटत नाही. भारत जगाला जागृत करण्यास सक्षम आहे; परंतु काही शक्ती भारताची प्रगती रोखू इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहून आपल्या राष्ट्रध्वजात दडलेल्या संदेशानुसार काम करून देश एकसंध ठेवला पाहिजे. जेणेकरून नकारात्मक शक्ती यशस्वी होऊ शकत नाहीत."
राष्ट्रध्वजाबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ध्वजाच्या शीर्षस्थानी असलेला भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे, जो जीवनाला तमसो मा ज्योतिर्गमय (अंधारातून प्रकाशाकडे) नेतो. पांढरा रंग कोणत्याही स्वार्थाशिवाय शुद्धतेने काम करण्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग श्री लक्ष्मी (संपत्ती) चे प्रतीक आहे जे बुद्धिमत्ता, विश्वास आणि निःस्वार्थ शक्ती प्राप्त करण्यास मदत करते.
मोहन भागवत म्हणाले की, भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवू शकतो.आपण सूर्याची पूजा करतो, म्हणूनच आपल्याला भारत म्हटले जाते. जगाला मार्ग दाखविण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा