Independence Day 2023 | काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात फडकला तिरंगा | पुढारी

Independence Day 2023 | काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात फडकला तिरंगा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील तीन दशके काश्मीर खोऱ्यात स्वातंत्र्य दिन दहशतवाद, कर्फ्यू, भीतीच्या सावटाखाली साजरा केला जायचा. परंतु आज (दि.१५) काश्मीरमध्ये तिरंगा अभिमानाने फडकविण्यात आला. काश्मीरमध्ये १९८९ मध्ये दहशतवादाचा उदय झाला. त्यानंतर आज ही पहिलीच वेळ आहे, श्रीनगरमध्ये कोणत्याही निर्बंध, सुरक्षा निर्बंध, शटडाऊन किंवा इंटरनेट बंदीशिवाय स्वातंत्र्यदिन उत्साहात, निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. (Independence Day 2023)

स्वातंत्र्यदिनाची अशी केली तयारी

जम्मू-काश्मीर प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक केले होते. सहभागी न होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच बक्षी स्टेडियमवर स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले. मात्र, स्टेडियमभोवती कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. यासोबतच संवेदनशील भागात चौक्या आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते. (Independence Day 2023)

Independence Day 2023 : कोणतेही सुरक्षेचे बंधन नव्हते

पहिल्यांदाच, १५ ऑगस्टरोजी जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या हालचालींवर कोणतेही सुरक्षेचे बंधन नव्हते. काश्मीरचे विभागीय आयुक्त व्ही. के. विधुरी यांनी सांगितले की, १५ ऑगस्टला हालचालींवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. यापूर्वी परिस्थिती अशी होती की १५ ऑगस्टशी संबंधित कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत खोऱ्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात येत होती. तसेच मोबाईल आणि इंटरनेट बंद करण्यात येत असे.

Independence Day 2023 : अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आल्या  

स्वातंत्र्य दिनानिमित्त काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आल्या. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही रविवारी दल सरोवराच्या काठावर रॅली काढली होती. दरम्यान, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीरोजी बंदची घोषणा करणारी हुर्रियत कॉन्फरन्स आता कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनावर त्यांचा प्रभाव दिसून आला नाही.

हेही वाचा 

 

Back to top button