Har Ghar Tiranga | राष्ट्रध्वजासह ‘सेल्फी’! हर घर तिरंगा वेबसाइटवर दुपारपर्यंत ९ कोटींहून अधिक सेल्फी अपलोड | पुढारी

Har Ghar Tiranga | राष्ट्रध्वजासह ‘सेल्फी’! हर घर तिरंगा वेबसाइटवर दुपारपर्यंत ९ कोटींहून अधिक सेल्फी अपलोड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहिमेअंतर्गत देशवासियांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. देशाचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्याचे व राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर तीन दिवसांच्या मोहिमेअंतर्गत मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा वेबसाइटवर राष्ट्रध्वजासह देशभरातील लोकांचे ९ कोटींहून अधिक सेल्फी अपलोड झाले आहेत.

हर घर तिरंगा वेबसाइटच्या होम पेजवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचा पर्याय दिसतो. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तिरंग्यासह ९ कोटी २० लाख ९९ हजार ३२५ सेल्फी अपलोड करण्यात आल्याचा उल्लेख आहे. देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतर्गंत घरावर तिरंगा लावल्यानंतर त्याचे फोटो हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगण्यात आले होते.

हर घर तिरंगा वेबसाइटच्या होम पेजवर ध्वज आणि डिजिटल तिरंगासोबत सेल्फी अपलोड करण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. त्या खाली स्क्रोल केल्यावर यूजर्संना भारतीय ध्वजासह केंद्रीय मंत्री, अभिनेते आणि खेळाडूंचे फोटो दिसतील. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल, अभिनेते अनुपम खेर आणि गायक कैलाश खेर यांचा समावेश आहे.

देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २२ जुलै रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली होती. गेल्या रविवारी पीएम मोदी यांनी पुन्हा सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतर्गंत नागरिकांमध्ये राष्ट्रभक्‍तीची भावना दृढ करण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) ठेवण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) बदलून त्या ठिकाणी राष्ट्रध्वज ठेवला होता. (Independence Day 2023)

संपूर्ण आठवडाभर नियोजित विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री शुक्रवारी दिल्लीतील प्रगती मैदान परिसरात ‘हर घर तिरंगा’ बाइक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या मोहिमेची दुसरी आवृत्ती असलेल्या या रॅलीला उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी हिरवा झेंडा दाखवला होता आणि प्रगती मैदान बोगद्यासह मथुरा रोड, भैरों रोड, इंडिया गेट मार्गेही रॅलीही काढण्यात आली.

एएनआय वृत्तसंस्थेने यापूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये किशन रेड्डी बाईक चालवताना दिसले होते, तर अनुराग ठाकूर हातात भारतीय राष्टरध्वज धरून मागे बसले होते. या रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. या बाईक रॅलीत केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे सहभागी झाल्या होत्या. त्या कर्नाटकच्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी (77th Independence Day) लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि देशातील जनतेला संबोधित केले. देशभरात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. (Har Ghar Tiranga)

 हे ही वाचा :

Back to top button