नाशिक : पुढारी वृत्तसेवा, शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी लेझर किरणांमुळे सहा रुग्णांच्या नेत्रपटलावर गंभीर दुष्परिणाम झाले आहेत. नेत्रविकार तज्ज्ञांची टीम संबंधित रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्यातील काही रुग्णांच्या दृष्टीत सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती नेत्रविकार तज्ज्ञ संघटनेने सोमवारी (दि. २) दिली. (Nashik News)
संबधित बातम्या :
दोन दिवसांपूर्वी शहरात विसर्जन मिरवणूक पार पडली. विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ३०) सहा रुग्णांमध्ये लेझरच्या किरणांमुळे दृष्टिदोष निर्माण झाल्याचे समोर आले. मिरवणुकीत लेझरच्या थेट संपर्कात आल्याने या रुग्णांना त्रास झाल्याचे समोर आले. याबाबत नेत्रविकार तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित खुने, डॉ. सचिन कासलीवाल व डॉ. गणेश भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
डाॅ. खुने यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकीनंतर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची विविध तपासणी करण्यात आली. काही रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमधून नेत्रपटलावर रक्तस्राव झाला. काही रुग्णांना जखमादेखील झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांशी अधिक संवाद साधला असता, ते २० ते ३० वयोगटातील आहेत. अप्रमाणित, असुरक्षित आणि अमानांकित लेझर किरणांमुळे हे दुष्परिणाम झाले आहेत. मिरवणुकीत ५० ते २०० मीटर अंतरावरून लेझर लाइट्सकडे थेट पाहिले. बराचवेळ लेझर लाइट्सकडे पाहिल्याने त्यांना त्रास झाल्याचे समोर आल्याचे डॉ. खुने म्हणाले. डाॅ. कासलीवाल यांनी, किती प्रखर लाइट होता व किती खोलवर जखम झाली आहे, यावर संबंधित रुग्णांचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले. डॉ. भामरे यांनी नेत्रविकार तज्ज्ञांची टीम रुग्णांवर उपचार करत आहे. किमान एक ते दीड महिना उपचार घेतल्यानंतर त्यांच्या दृष्टीत किती सुधारणा होईल हे कळू शकेल, असे यावेळी सांगितले.
रुग्णसंख्येत वाढ?
नेत्रविकार तज्ज्ञांच्या राज्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार नाशिकसह पुणे, नंदुरबार, धुळे आणि मुंबईतही असे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी भीती संघटनेकडून व्यक्त करण्यात आली. पब्ज, पार्ट्यांमध्येही लेझर लाइट्सचा वापर होतो. परंतु हे लाइट्स हवेत किंवा वरच्या बाजूला सोडले जातात. ते थेट लोकांच्या शरीरावर सोडले, तर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. नागरिकांनी थेट लेझरच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले.
हेही वाचा :