नाशिक : पुढारी वृत्तसेवा, नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. डीजे आणि लेझर शोच्या गजरात उत्साही युवांनी नाचत, थिरकत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. मात्र, या मिरवणूकीनंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवसापासूनच शहरातील अनेक नेत्रतज्ज्ञांकडे नेत्ररुग्ण वाढू लागले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांची नजर कमजोर झाल्याचे दिसून आले आहे. नेत्रपटलावर खूप रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्याच्या अनेक घटना नेत्ररोग तज्ज्ञांच्या निदर्शनास आल्या आहेत.
डॉक्टरांनी अधिक माहिती जाणून घेतल्यावर हे तरुण गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत सहभागी झालेले होते, त्यांनी मिरवणुकीत डीजेवर लेझर शो बघितल्याची माहिती आहे. वैद्यकीय तपासानुसार ग्रीन लेझरची फ्रिक्वेन्सी जास्त होती. जे तरुण या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांच्याबाबत हा प्रकार घडला असल्याचे समजते.
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नाशिकच्या नेत्र रोग संघटनेने पत्रकारपरिषदेचे आज आयोजन केले आहे. नाशिकच्या आयएमए हॉल येथे ही पत्रकारपरिषद होणार असून नेत्ररोग तज्ज्ञ याठिकाणी यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.