पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थाचे रॅकेट चालविणारा आरोपी ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पसार झाल्याचे समोर आले आहे. रात्री साडेसात ते पावने आठ वाजताच्या सुमारास त्याला छातीचा एक्सरे काढण्यासाठी वार्ड क्रमांक १६ मधून बाहेर काढण्यात आले होते' त्यावेळी ड्युटीवरील पोलिस गार्डच्या हाताला हिसका मारूण तो फरार झाला आहे. चाकण पोलिस ठाण्याच्य गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता.
ससून रुग्णालयातून पाटील हा अंमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक किलो एमडीची तस्करी करताना त्याच्यासह दोघांवर शनिवारी कारवाई केली होती. या प्रकरणात पाटीलसह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मंडल आणि शेख यांना अटक केली होती.
मात्र, पाटील हा दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असून उपचार घेत असल्यामुळे त्याला न्यायालयाच्या परवानगी अटक करावी लागत होती. पण, त्याच्या अगोदरच तो उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मधून सोमवारी रात्री पसार झाला. ही माहिती मिळताच गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचा बंदोबस्त असताना पाटील पळून कसा गेला असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. पाटील हा ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर भेट तो रेल्वे स्टेशनकडे पळाल्याची महिती आहे . त्याने अंगावर काळे जॅकेट घातले आहे.
हेही वाचा