पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी महापालिकेने व्यवस्था केलेल्या विसर्जन हौद आणि मूर्तिसंकलन केंद्रांमध्ये दहा दिवसांमध्ये 5 लाख 61 हजार 428 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत एक लाख 31 हजार 337 ने अधिक आहे. तर विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 4 लाख 4 हजार 673 मूर्तींचे विसर्जन झाले असून, दहा दिवसांत 627 टन निर्माल्य संकलित झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
गणेश विसर्जनासाठी महापालिकेने पहिल्या दिवसापासूनच विविध प्रकारच्या व्यवस्था सज्ज केल्या होत्या. यामध्ये 303 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करत शहरात 150 फिरते विसर्जन हौद, 48 बांधीव हौद, 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या, 252 मूर्तिसंकलन व मूर्तिदान केंद्रे व 256 ठिकाणी निर्माल्य कलश आदींची व्यवस्था केली होती.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये शहरात एकूण 5 लाख 61 हजार 428 मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये महापालिकेच्या मूर्तिसंकलन व दान केंद्रात 110821, फिरत्या हौदामध्ये 59126, लोखंडे टाक्यांमध्ये 291560, बांधीव हौदांमध्ये 99921 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गतवर्षी 4 लाख 30 हजार 91 मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदाची संख्या गतवर्षीच्या तुलनेत 1 लाख 31 हजार 337 ने जास्त आहे.
महापालिकेने आपल्या सर्वच विसर्जन ठिकाणांवर आणि मूर्तिसंकलन केंद्रांवर निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. गणेशभक्तांनी 'निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असावा. कोणीही निर्माल्य नदीपात्र, कालव्यात किंवा तलावात टाकू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, दहा दिवसांत 627 टन निर्माल्य संकलित झाले आहे. गतवर्षी 567 टन निर्माल्य निर्माल्य संकलित झाले होते.
गेली दहा दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता दोन दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीदरम्यान विविध रस्त्यांवर तब्बल 334 टन कचरा संकलित झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता करणारी विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झाली आणि शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संपली. या मिरवणुकीसाठी महापालिकेने विविध स्तरांवर तयारी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून विसर्जनमार्गाची स्वच्छता करण्यासाठी दोन हजार सफाई कर्मचार्यांची नेमणूक केली होती. याशिवाय विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनीही स्वच्छेने मिरवणुकीनंतरच्या स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला.
लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, नारायण पेठ रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, अलका चौक, खंडुजीबाबा चौक, कर्वे रोड, जंगली महाराज रोड, सेनापती बापट रोड, गणेशखिंड रोड, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, प्रभात रोड, भांडारकर रोड, पुणे-मुंबई रोड या मुख्य विसर्जनमार्गावर सफाई कर्मचार्यांनी मिरवणुकीनंतर स्वच्छता मोहीम राबवून 33 टन कचरा संकलित केला.
हेही वाचा