राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रात शिक्षक भरती; शिक्षण आयुक्तांचे निर्देश | पुढारी

राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रात शिक्षक भरती; शिक्षण आयुक्तांचे निर्देश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या 5 ऑक्टोबरची डेडलाइन देण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी नगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भरतीसंदर्भात निर्देश दिले आहेत.

शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-2022 मध्ये प्रविष्ठ असलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार निवड करून नियुक्ती करण्याबाबत शासनाने स्पष्ट केले आहे. काही उमेदवारांनी चाचणीच्या वेळी अनावधानाने पेसा क्षेत्र होय / नाही या रकान्यात नाही नमूद केलेले आहे. अशा उमेदवारांच्या बाबतीत या कार्यालयाकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची माहिती संबंधित जिल्हा परिषदांना कळविण्यात आली आहे.

तसेच अन्य उमेदवारांची पात्रता तपासून ते पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे असतील त्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र तयार केलेले आहे. अशा उमेदवारांचा तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याआधारे त्यांच्या नमूद कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेण्यात यावा. पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची निवड प्रक्रिया 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही ऑक्टोबर 2003 च्या दुसर्‍या आठवड्यामध्ये समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

पुणेकरांनो लक्ष द्या; आज शहरातील वाहतुकीत मोठे बदल

पुणे : गांधीजींचे ससूनमधील स्मारक होणार खुले

गेलेले आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

Back to top button