चांदवड(जि. नाशिक) :
सह्याद्री पर्वत रागांतील सातमाळा डोंगररांगांच्या कुशीत चांदवड गाव वसलेले आहे. चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे. चांदवड हे पुराणकाळी चंद्रहास राजाची राजधानी होती. अनेक पौराणिक साहित्यांमध्ये चांदवडचा विविध नावांनी उल्लेख दिसून येतो. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले चांदवड हे अनेक कुळांची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील ३०० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेले इच्छापूर्ती गणेश मंदिर हे गणेशोत्सवात भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलले आहे. गणेशबारीचा इच्छापूर्ती गणेश म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. (Ichchapurti Ganesh Mandir)
संबधित बातम्या :
चांदवडजवळील वडबारेजवळच्या इच्छापूर्ती गणेश मंदिराची स्थापना यादव काळात झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला गणेशबारी असे म्हटले जाते असे ज्येष्ठ इतिहास संशोधक संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले. ओघात लुप्त झालेल्या या गणेश मंदिराचे महात्म्य खऱ्या अर्थाने १९६० च्या दरम्यान पुढे आले. त्याकाळी चांदवड जिल्हा परिषद रुग्णालयात डॉ. विश्वनाथ साळगावकर नावाचे वैद्यकीय अधिकारी काम करीत होते. मूळ कोकणातील असलेले डॉ. साळगावकरांना रुग्णसेवा करताना डोंगराच्या पायथ्याला चिंचेच्या झाडाखाली असलेल्या या गणेशमूर्तीचे सानिध्य लाभले. आपल्या मित्र परिवारासह डॉ. साळगावकर या गणेशमूर्तीची सेवा करण्यासाठी कायम येऊ लागले. गणेशमूर्ती असलेल्या जागेचे मालक शिवराम जाधव यांनी गणेशाच्या दृष्टांतानुसार या जागेवर ट्रस्ट करा व गणेशमूर्ती परिसराची जागा मी दान देतो, असे सांगत डॉ. साळगावकरांनी स्थापन केलेल्या गणेश मित्रमंडळ ट्रस्टला ही जागा दान दिली. त्यानंतर गणेश मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ करून चांगले वातावरणनिर्मिती करीत गणेशमूर्ती असलेल्या जागेत छोट्या मंदिराची उभारणी केली. या ठिकाणी पूजा व धार्मिक विधी कार्यक्रम, वृक्षलागवड, कुंपण करण्यात आले. हे सगळे करताना अनेक गणेशभक्तांनी आपले पद व मोठेपणा बाजूला ठेवून श्रमदान केले. पूर्वीच्या काळी गणेशमूर्तीमागे असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्यांनी गणेशमूर्तीवर छत्र धरले होते. ते पुरातन चिंचेचे झाड आजही तसेच आहे. याच भागातील मुंबई येथे स्थायिक असलेल्या सरदार नामदेवराव जाधव या उद्योगपतीने त्या काळी ५१ हजार रुपयांची देणगी मंदिर विकासासाठी दिली. देणगी आणि भाविकांचे योगदान यातून सभामंडपासह अनेक विकासकामे मंदिर परिसरामध्ये झाली. येथे दर संकष्टी चतुर्थीला गणेशमूर्तीवर चांदीचे झुंबर, टोप, कान, त्रिशुल, गदा, कडे आदी भाविकांनी केलेले आभूषणे चढवली जातात. ही आभूषणे गणेशमूर्तीवर विराजमान झाल्यावर गणेशाचे आगळे वेगळे रूप भाविकांना खिळवून ठेवते. गणेशमूर्तीची दररोज पूजा अर्चा, आरती तर होतेच परंतु दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला ट्रस्टतर्फे महापूजा, अभिषेक करण्यात येतो. दरवर्षी गणेश जयंतीला गणेश याग, जन्मोत्सव, महापूजा, सहस्रावर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने करण्यात येतात. सध्या इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टतर्फे गाभाऱ्यात गोल्ड प्लेटेड वर्क सुरू आहे. हे काम श्री विपुलभाई कंसारा, बडोदा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जे भाविक मनोभावे देवाची आराधना करतात. त्यांची श्री गणेश नक्कीच मनोकामना पूर्ण करतात. ही आजवरची या गणेशाची ख्याती आहे. त्यामुळे या गणरायाला इच्छापूर्ती गणेश असे संबोधले जाते. दर चतुर्थीला भाविक भक्त या ठिकाणी गणेशाच्या चरणी लीन होतात.
हेही वाचा :