सिंधुदुर्गनगरी बनली ‘अंधेरी’नगरी; खंडित वीज प्रवाह, अस्वच्छतेने रहिवासी त्रस्त | पुढारी

सिंधुदुर्गनगरी बनली 'अंधेरी'नगरी; खंडित वीज प्रवाह, अस्वच्छतेने रहिवासी त्रस्त

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्‍तसेवा सिंधुदुर्ग नगरीला अनेक समस्‍यांनी ग्रासले आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य आणि अवैद्य अनेक प्रकार काही प्रमाणात घडत असताना ऐन गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ठिकाण वीज प्रवाह खंडित होत असल्यामुळे अंधेरीनगरी बनली आहे. पोलीस कॉलनी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक खाजगी गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम सुरू असताना येथील रहिवाशांना खंडित वीज प्रवाहाचा फटका बसत आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत व्हावी अशी केले अनेक वर्षांची येथील ग्रामस्थांची मागणी आहे, परंतु ही नगरपंचायत राजकीय सारीपाटात अडकल्यामुळे प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या अंधेरी नगरीत अनेक वेळा जिल्हा परिषद कॉलनी, पोलीस कॉलनी, कलेक्टर कॉलनी आणि कार्यालयीन परिसरात सरपटणाऱ्या जनावरांचा वावर होताना दिसत आहे. निवासी संकुलात आत्ता अनेक जणांना या सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज प्रवाह खंडित होणे, अस्वच्छता, झाडी, धुडपांणी वेढलेल्या या परिसरात येथील रहिवाशांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे.

प्राधिकरणाच्या माध्यमातून हवा तेवढा विकास होत नाही. तत्कालीन राज्य शासनाने २५ वर्षाच्या महोत्सवी वर्षात २५ कोटी निधी मंजूर केला. त्यापैकी आठ कोटीच फक्त प्राप्त झाले. उर्वरित निधी मात्र कागदावरच राहिला. तत्कालीन पालकमंत्री आणि सदरचा निधी मिळणार आहे. त्यानंतर नगरपंचायत होईल असे गोंडस गाजर येथील पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दाखवले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी अडकलेल्या या सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत प्रस्ताव धुळकात पडला आहे.

सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपा त्याचबरोबर राष्ट्रवादी यांचे एकमुखी सरकार आहे, परंतु सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायतीच्या या न्याय प्रश्न सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे हा प्रश्न भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील शिंदे सरकारने या न्याय प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास येथील खंडित वीज प्रवाहाचा फटका कर्मचाऱ्यांना बसून चोरी, लुटमार, अवैध धंदे, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळेच या वस्तीचा विकास होताना दिसत नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक रहिवाशांनी प्लॉट घेतले आहेत. अनेक कर्मचारी कुडाळ कणकवली व अन्यत्र राहतात सिंधुदुर्ग नगरीत राहण्याची इच्छा असूनही गैरसोयीचे असलेले साम्राज्य कर्मचाऱ्यांना त्रासदायक आणि जीवघेणे ठरत आहे. या अंधेरी नगरीचा शासन कधी विकास करणार आणि कधी लक्ष देणार याबाबत कर्मचारी आणि रहिवासीवर्गातून एकच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button