Kolhapur Ganeshotsav : आमचा बाप्पा.. विधायक बाप्पा; सामाजिक उपक्रमांची झालर

Kolhapur Ganeshotsav : आमचा बाप्पा.. विधायक बाप्पा; सामाजिक उपक्रमांची झालर
Published on
Updated on

कोल्हापूर :  गणेशोत्सव म्हटले की लाईटचा झगमगाट, साऊंड सिस्टीमचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी असे काहीसे चित्र एका बाजूला आहे. तर दुसर्‍या बाजूला लोकवर्गणीचा योग्य वापर करून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांवर भर देणारी गणेश मंडळेही कमी नाहीत. काही मंडळांनी तर मागील कित्येक वर्षांत वर्गणी न मागता, केवळ सभासदांच्या पैशातून गणेशोत्सव साजरा केला आहे.

डांगे गल्ली तरुण मंडळ

यावर्षी वर्गणी नको… वर्गणीऐवजी घरातील अडगळीत पडलेल्या टाकाऊ वस्तू द्याव्यात, असे आवाहन जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने केले आहे. मागील आठ वर्षांपासून या मंडळाने विविध सामाजिक विषयांवर देखावे सादर केले आहेत. यंदाही टाकाऊ वस्तूंपासून देखावा साकारण्यात येणार आहे.

विद्यार्थी कामगार मित्र मंडळ

प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम राबविणार्‍या शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने यंदा मदतीची ट्रेन उपक्रम हाती घेतला आहे. ही वर्गणी शिंगणापूर येथील क्रांती हँडीकॅप हेल्प फाऊंडेशन संस्थेला मदतीचा हात दिला जाणार आहे. विधायक पेटी व विधायक ट्रेन या माध्यमातून गणेशोत्सव काळात जमणारी सर्व रक्कम क्रांती संस्थेकडे सुपुर्द केली जाईल. क्रांती संस्थेतील दोन दिव्यांग मुलींचे छायाचित्र दैनिक 'पुढारी'ने रक्षाबंधनादिवशी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन मंडळाकडून ही मदत देणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 50 हजारांचे शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा संदेश देत शाडूची गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या गणेशमूर्तीचे वजन तब्बल 500 ते 600 किलोपर्यंत जाते. ही मूर्ती पूर्णपणे शाडूपासून बनविण्यात येते.

स्पार्टन बॉईज, पाडळी खुर्द

गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणूक खर्चाला फाटा देऊन पाडळी खुर्द येथील स्पार्टन बॉईज मंडळाने बालकल्याण संकुलला धान्य दिले. मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष ओंकार पाटील, तानाजी पालकर, विजय पाटील यांच्या उपस्थितीत हे धान्य सुपुर्द करण्यात आले. यासोबतच सामाजिक उपक्रम राबविणार्‍या जवाहर नगरातील बाल गणेश मित्र मंडळ, शाहूपुरीतील व्यापारी युवक मित्र मंडळ यांचा विधायक गणेशोत्सवाबद्दल चिल्लर पार्टी संस्थेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सत्कार करण्यात आला.

दिलबहार तालीम मंडळाकडून अवयवदान जनजागृती, रक्तदान उपक्रम

दिलबहार तालीम मंडळाने भव्य गणेशोत्सवासोबत अवयवदान जनजागृती, रक्तदान उपक्रम यंदा हाती घेतला आहे. मंडळाच्यावतीने भागात ठिकठिकाणी अवयवदान जागृतीचे फलक लावण्यात येत आहेत. तसेच रक्तदान शिबिरासाठीही तरुणांना आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अध्यक्ष विनायक फाळके, पद्माकर कापसे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news