पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 या वर्षासाठी सर्वोत्तम 11 कसोटी (ICC Test Team) खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक देशांच्या खेळाडूंना त्यांच्या कसोटी फॉर्मेटमधील कामगिरीच्या जोरावर स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या केन विल्यमसनची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात तीन भारतीय खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. पुरुषांच्या वनडे (ODI) आणि टी 20 (T20) टीम ऑफ द इयरमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.
श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि भारताचा रोहित शर्मा यांची आयसीसी (ICC) कसोटी संघात सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांची अव्वल क्रमवारीत निवड करण्यात आली आहे. यानंतर मधल्या फळीत कर्णधार केन विल्यमसन, फवाद आलम आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांची निवड झाली आहे. गोलंदाजी विभागात एक फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. फिरकीसाठी भारताचा रविचंद्रन अश्विन, तर वेगवान म्हणून न्यूझीलंडचा काईल जेमिसन आणि पाकिस्तानचे हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा गोलंदाज म्हणून समावेश आहे. (ICC Test Team)
आयसीसीने जाहीर केलेल्या या यादीतील आश्चर्याची बाब समोर आली आहे. कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीचा आयसीसीच्या कसोटी संघात समावेश होऊ शकलेला नाही. विराट कोहलीची कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीतील खराब कामगिरी हे त्याला संघातून वगळण्याचे कारण असू शकते. विराटने अलीकडेच कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. आता तो टीम इंडियाच्या कसोटी, वनडे, टी 20 या संघांचा कर्णधार नसेल. एक खेळाडू म्हणून तो खेळेल.
दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लॅबुशेन, जो रूट, केन विल्यमसन (कर्णधार), फवाद आलम, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, काइल जेम्सन, हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी.