पुणे : पुढारी वृत्तसेवा
भाजीपाला, अन्नधान्य, खाद्यतेलापाठोपाठ गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती हॉटेल व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. येत्या काळात इंधन दरवाढीवर कोणतेही नियंत्रण न आल्यास खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याची तयारी शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केली आहे. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेलाचे भाव वाढले, तर हॉटेल व्यवसायाला कुठे फारसा फरक पडतो? त्याचा भार तर ग्राहकांच्या खिशावर पडतो, असे मानले जात असे. आता मात्र ही अटकळ खोटी ठरतेय.
गेल्या काही दिवसांत महागाईचा डोंब जसजसा उसळत आहे, तसतसा हॅाटेल व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. हॉटेलिंग क्षेत्रात वापरल्या जाणार्या 19 किलोंच्या व्यावसायिक गॅसचे दर सध्या 2 हजार 362 रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरापूर्वी तो 1 हजार 700 रुपयांना मिळत होता. एकप्रकारे महिनाभरात गॅसच्या दरात तब्बल 662 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह खाद्यपदार्थांसाठी लागणार्या जिनसांच्या दरातही गेल्या वर्षभरात वीस ते चाळीस टक्के, तर महिनाभरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याच्या विचारात असलेले हॉटेल व्यावसायिक ग्राहकांची संख्या कमी होईल, ही भीतीही बाळगून आहेत. वाढत्या महागाईत आहे त्या परिस्थितीत हॉटेल चालविले जात असल्याने या व्यवसायाच्या नफ्या-तोट्याचे गणित साफ बिघडून गेले आहे. कोरोनानंतर सर्व पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असताना वाढत्या महागाईचा ठसका हॉटेल इंडस्ट्रीलाही लागत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईपुढे व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा आहे.
खाद्यपदार्थांमध्ये दरवाढ केल्यास ग्राहकांची संख्या दहा ते वीस टक्क्यांनी कमी होईल. जे यापूर्वी स्वस्तात खाद्यपदार्थांची विक्री करत होते त्यांना आता ते दर परवडणारे नसल्याने त्यांनी दरवाढ केली आहे. आगामी एक ते दोन महिने दरवाढीची काय परिस्थिती असेल त्यावर निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारने युद्धाचे कारण सांगितले आहे. मात्र, सरकारने गॅस सिलिंडर व इंधन दरवाढीवर ब्रेक लावण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. भाजीपाला, अन्नधान्यातील महागाई थांबविता येणार नाही. मात्र, इंधन दरवाढीवर नियंत्रण आणणे शक्य आहे.
– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स